होमपेज › Goa › अन्न, औषधातील भेसळ रोखण्यास‘एफडीए’ची फिरती प्रयोगशाळा

अन्न, औषधातील भेसळ रोखण्यास‘एफडीए’ची फिरती प्रयोगशाळा

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 12:14AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

खाद्यपदार्थ तसेच औषधातील भेसळ शोधून गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य अन्‍न आणि औषध प्रशासनातर्फे  सुमारे 41 लाख रुपये खर्चून अत्याधुनिक फिरती प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. राज्यात कोणत्याही ठिकाणी जाऊन पदार्थाचे 15 मिनिटांत परीक्षण करणार्‍या या प्रयोगशाळेचे येत्या रविवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. फिरती प्रयोगशाळा असणारे गोवा हे पहिलेच राज्य आहे, असेही ते म्हणाले. 

आरोग्यमंत्री या नात्याने आपण आपल्या खात्यातील अनेक विभागांचा तसेच इस्पितळांचा अचानक दौरा करून पाहणी करतो. बांबोळी येथील राज्य अन्‍न आणि औषध प्रशासन  कार्यालयाची आपण बुधवारी पाहणी केली होती. त्यावेळी राज्यात अत्याधुनिक फिरती प्रयोगशाळा आणण्याबाबत काय तयारी झाली, याचा आढावा घेतला. सदर वाहन  ग्रामीण भागात कुठेही नेता येणार  असून पार्क केलेल्या जागी एखाद्या पदार्थाचे परीक्षण या वाहनात करण्याच्या सर्व यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. केंद्राकडून गोव्याला अशी फिरती  प्रयोगशाळा सर्वात आधी मिळाली असून यानंतर अन्य राज्यांनीही या वाहनांची मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले. 

परप्रांतीयांना  शुल्क लागू होणार 

परराज्यातील रुग्णांना सरकारी इस्पितळांमध्ये शुल्क आकारणी  करणे निश्चित असून पुढील आठवड्यात  कधीपासून आकारणी  केली जाईल याची घोषणा केली जाणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले. या शुल्क आकारणीला राज्यातील कोणाचाही विरोध नाही. मात्र, अन्य राज्यातून या योजनेला विरोध होत असेल तर आपल्याकडे कोणी तसा संपर्क साधलेला नाही. गोमंतकीय जनतेचे हीत लक्षात घेऊन ही शुल्क आकारणी केली जाणार आहे, असेही राणे यांनी सांगितले.