होमपेज › Goa › कुजिरा शिक्षण संकुल पहिल्या दिवशी कोंडीमुक्‍त 

कुजिरा शिक्षण संकुल पहिल्या दिवशी कोंडीमुक्‍त 

Published On: Jun 05 2018 1:41AM | Last Updated: Jun 05 2018 1:34AMपणजी : प्रतिनिधी 

राज्यातील सर्व  शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने सोमवारी गजबजून गेल्या. उन्हाळी सुट्टीचा पुरेपूर आनंद घेतल्यानंतर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांकडे विद्यार्थ्यांची पावले वळली. यंदा प्रशासनाने आखलेल्या उपाययोजनांमुळे बांबोळी येथील कुजिरा शिक्षण संकुलात वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात मात झाल्याचे दिसून आले. 

दीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर  शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला. शाळेत पहिला दिवस असलेल्या विद्यार्थ्यांची विद्यालय आवारात रडारड चालली होती. पालकांची या विद्यार्थ्यांना सावरण्याची धडपड दिसत होती. शाळेचा पहिला दिवस असल्याने बहुतेक पालक आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी खासगी वाहने घेऊन आले होते. त्यामुळे शाळेच्या आवारात काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. गतवर्षी कुजिरा शैक्षणिक संकुलात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना चालकांना करावा लागला होता. मात्र, यंदा वाहनांसाठी पार्किंग व अन्य व्यवस्था असल्याने वाहतूक सुरळीत व्हावी, या दिशेने प्रयत्न करण्यात आलेले दिसले.  

विद्यालयांसमोर सोमवारी सकाळी पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शाळेचा पहिला दिवस असल्याचे शाळा मधल्या सुट्टीनंतर लवकर सोडण्यात आल्या.

दरम्यान, सोमवारी सकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याने विद्यार्थ्यांमध्येही  रंगीबेरंगी छत्र्या आणि रेनकोट चढवून शाळेत जायला मिळाल्याने वेगळाच उत्साह  संचारला होता. नवीन गणवेश, पाठ्यपुस्तके, दप्तर घेऊन विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. शालेय वर्षाला सुरुवात झाली असली तरी बाजारपेठेत अजूनही पालकांची स्कूल बॅगा, रेनकोट, छत्र्या, पावसाळी सँडल्स, वह्या-पुस्तके, कंपास, पाण्याची बाटली, खाऊचा डबा आदी वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.