Mon, May 27, 2019 00:38होमपेज › Goa › ऑम्लेट गाड्यांवरून राजकारण तापले

ऑम्लेट गाड्यांवरून राजकारण तापले

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 05 2018 12:28AMमडगाव  : प्रतिनिधी

कोकण रेल्वे स्थानकाच्या हाकेच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यालगत सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या ऑम्लेट पाव गाड्यांच्या मुद्यावरून मडगावात राजकारण बरेच तापले आहे. कोणीही हस्तक्षेप करो, गाड्यांवर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा मेमो देणार , असा इशाराच मडगावच्या नगराध्यक्षा  बबिता आंगले यांनी अधिकार्‍यांना दिला आहे. तर दुसरीकडे कारवाई करू नका, आपण काय ते पाहून घेऊ, असा दम एका राजकारण्याने दिल्यामुळे दोन्ही बाजूने येणार्‍या दबावामुळे अधिकार्‍यांचे मात्र सँडविच झाले आहे. मडगाव अग्निशामक दलाच्या इमारतीपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कोकण रेल्वे स्थानकाजवळ सुरू असलेल्या ऑम्लेट पाव गाड्यांची मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष बबिता आंगले यांनी पाहणी करुनसुद्धा तेथील परिस्थिती बदललेली नाही.

नगराध्यक्षांनी मुख्याधिकार्‍यांशी चर्चा करुन पालिका आणि स्वच्छता निरीक्षकाना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही याची प्रचिती त्या अधिकार्‍यांना आली. विदेश  दौर्‍यावर गेलेल्या एका राजकारण्याचा अधिकार्‍यांना फोन आला आणि कारवाईचा आदेश हवेत विरला. कारवाई केली तर राजकारण्याची भीती आणि कारवाई केली नाही तर पालिकेतून मेमो मिळण्याची भीती, त्यामुळे नेमके करावे तरी काय या विवंचनेत अधिकारीवर्ग सापडलेला आहे. नगराध्यक्षा बबिता आंगले यांनी गेल्या आठवड्यात कोकण रेल्वे स्थानकावर सर्व नियमांना फाटा देऊन सुरू असलेल्या गाड्यांची पाहणी केली होती. स्थानिकांनी परप्रांतीयांना गाडे भाडेतत्त्वावर चालवण्यास दिले होते. गाडे चालविणार्‍यांकडून गाड्यावर घरगुती सिलिंडरचा वापर करण्यात येतो.

तसेच दुकानातील कचरा नाल्यात टाकण्यात येत असल्याचा प्रकार यावेळी समोर आल्यामुळे नगराध्यक्ष आंगले यांनी कडक कारवाईच्या सूचना दिल्या   होत्या. ऑम्लेट पाव व वडापावच्या  गाड्यांवर जेवणताट विक्रीही केली जात होती. घरगुती सिलिंडरचा वापर बेकायदेशीर असला तरीही सर्व गाड्यांवर स्वयंपाकासाठी घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्याचे दिसून आले होते. आंगले यांनी गाडे चालकांची चौकशी केली व अग्निशामक दलाला त्याची माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितले होते. पोलिस, अग्निशामक दल, अन्‍न व औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने आंगले यांनी मुख्याधिकारी जॉन्सन फेर्नांडिस यांच्याशी चर्चा करुन स्वच्छता निरीक्षकांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

‘पुढारी’शी बोलताना आंगले यांनी सांगितले,की हे प्रकार रात्री उशिरा घडत असल्याने बाजार निरीक्षकांनी रात्र उशिरासुद्धा ड्युटी करण्याची गरज आहेे. गाडेवाले गटारात कचरा फेकत असल्याने पालिकेने स्वच्छता निरीक्षक विराज आराबेकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन केले होते. या पथकाने दोन गाड्यांवर कारवाई केली आहे. या गाडेधारकांकडून मोठ्या प्रमाणात गाड्यांचा बेकायदा विस्तार करण्यात आलेला आहे. हे विस्तारीकरण काढून टाकण्यासाठी पालिकेचा तांत्रिक विभाग प्रयत्नशील आहे, त्यांना पाहणी करुन अहवाल देण्यास सांगितले आहे, अशीही माहिती आंगले यांनी दिली.