होमपेज › Goa › अल्पवयीन मुलीचे अपहरण

अल्पवयीन मुलीचे अपहरण

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 23 2018 12:15AMमडगाव : प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील नऊवर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून गोव्यात आणल्याप्रकरणी मयडे येथील नंदकिशोर चारी याला कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केली असून त्या अल्पवयीन मुलीला त्याच्या तावडीतून सोडवून मेरशी येथील अपना घरमध्येे पाठविण्यात आले. थिवी रेल्वे स्थानकावर चारी याला पकडण्यात आले. या मुलीचे धर्मांतर करण्यासाठी अपहरण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला असून त्याद‍ृष्टीने तपास सुरू आहे.

कोकण रेल्वे स्थानकावर चारी हा त्या मुलीला घेऊन उतरला असता पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या मुलीविषयी तो पोलिसांना समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. त्याची कसून चौकशी केली असता त्या मुलीला ख्रिश्‍चन धर्माचे शिक्षण देण्यासाठी तिला गोव्यात आणण्यात आल्याची माहिती त्याच्याकडून पोलिसांना प्राप्त झाली.

बायलांचो एकवोटच्या अध्यक्षा आवडा व्हिएगस यांच्यासमोर त्या अल्पवयीन मुलीची जबानी नोंद करून घेण्यात आली आहे. हा धर्मांतरणाचा प्रकार असून परराज्यातील अल्पवयीन मुलांना त्यांच्या गरिबीचा फायदा उठवून गोव्यात आणून त्यांचे धर्मांतरण केले जात असल्याचे या प्रकारामुळे समोर आले आहे. अशा धर्मांतराकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे त्या म्हणाल्या. आवडा व्हिएगस यांनी दै. पुढारीशी बोलताना त्या मुलीचे वय नऊ वर्षे असल्याचे सांगितले. त्या मुलीचे व चारी यांचे कोणतेही रक्ताचे नाते नसल्याचे तपासात आढळून आले आहे. सदर मुलीचे कुटुंब अतिशय गरीब आहे. तिला आईवडील चार बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे.

त्या मुलीच्या गरीबीचा फायदा घेऊन तिचे धर्मांतरण करण्यासाठी तिला गोव्यात आणले जात होते, अशी शक्यता आवडा व्हिएगस यांनी व्यक्त केली आहे. चारी हा हिंदू असल्याने त्याला येशू विषयी आणि ख्रिश्‍चन धर्मा विषयी कसे कळू शकेल, असा प्रश्‍न त्यांनी  उपस्थित केला आहे. पुस्तके वाचून ख्रिश्‍चन धर्माची शिकवण कोणी देऊ शकत नाही. धर्मांतराच्या प्रकारावर सरकारने लक्ष ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.