केरी ः वार्ताहर
आजचा जमाना हा मोटारीचा पण या जमान्यात विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेचे सदस्य संकेत नाईक, संगम पाटील व त्यांच्या बरोबर चित्रकार नितेश परुळेकर यांनी सायकलवरून 600 किलोमीटर अंतर कापून गोवा ते हम्पी हा प्रवास पूर्ण केला. गोव्यातील 13 व्या शतकातील कंदबकालीन तांबडीसुर्ला मंदिर परिसरातून हा प्रवास सुरू करून थेट 15 व्या शतकातील कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या पात्रातील ‘हम्पी’ येथे जाऊन पुन्हा गोव्यात आले.
सदर प्रवास अनमोड घाटमार्गे कर्नाटकातील धारवाड - हुबळी- गदग- कोप्पल - होस्पेट - कमलापूर हम्पी व परत असा हा पाच दिवसांचा प्रवास केला. सदर प्रवासाविषयी बोलताना संकेत नाईक, संगम पाटील व नितेश परुळेकर म्हणाले की, पहिल्या दिवशी 130 किलोमीटर अंतर कापून हुबळी येथे मुक्काम तर दुसर्या दिवशी 160 किलोमीटर अंतर पार करून होस्पेट कमलापूर येथे मुक्काम, तिसर्या दिवशी पूर्ण हम्पी फिरायचे व परत त्याच वाटेने परत यायचे असा हा बेत करण्यात आला होता आणि तो झाला.