Tue, May 21, 2019 12:56होमपेज › Goa › कारवारचे आमदार सैल यांची  दोन तास कसून चौकशी

कारवारचे आमदार सैल यांची  दोन तास कसून चौकशी

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 13 2018 10:52PMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाण घोटाळा प्रकरणी कारवारचे  अपक्ष आमदार सतीश सैल यांची शुक्रवारी विशेष तपास पथकाच्या अधिकार्‍यांनी (एसआयटी) तब्बल दोन तास चौकशी  केली. त्याआधी सकाळी येथील सत्र न्यायालयाने  सैल यांना सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. एसआयटीने याआधी अटक केलेल्या काही ट्रेडर्समुळे आमदार सैल यांचा खाण घोटाळ्यातील सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या ट्रेडर्सकडून त्यांनी चोरीचा खनिज माल विकत घेतल्याचा संशय आहे. आपल्याला अटक होईल, या भीतीने सैल यांनी दाखल     

केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सकाळी सुनावणी घेण्यात आली. सैल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणीसाठी आला असता पोलिसांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागून घेतली. त्यानंतर न्यायालयाने सशर्त   जामीन मंजूर केल्याने सैल यांना दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयाने शुक्रवारी सकाळी  सुनावणीवेळी एसआयटीसमोर उपस्थित राहण्यास व आवश्यक तेव्हा चौकशीला हजर राहण्यास सैल यांना बजावले. त्यानुसार आ. सैल संध्याकाळी 4 वाजता रायबंदर येथील एसआयटी अधिकार्‍यांसमोर दाखल झाले. निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी पोलिस अधीक्षक कार्तिक कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची तब्बल दोन तास चौकशी केली. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांना जाऊ देण्यात आले. 

गोव्यात 2007 ते 2012 या काळात झालेला बहुतांश खनिजोद्योग हा बेकायदेशीर होता. लिजांचे नूतनीकरण न करताच खाणींतून खनिजाचे बेकायदा उत्खनन खाण उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर चालू ठेवले. कोट्यवधी रुपयांचे खनिज सरकारला रॉयल्टीही न देता निर्यात करण्यात आले होते. या प्रकरणात चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या एम. बी. शहा आयोगाने नंतर तब्बल 35 हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला होता. या आमदाराचा खाण घोटाळ्याशी प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे एसआयटीला मिळाले आहेत. विशेषत: खनिज निर्यात प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Tags : Goa, Karwar, MLA, Sail, two, hour, long, investigation