Wed, Mar 27, 2019 06:18होमपेज › Goa › कांदोळी, कळंगुट पीडीएतून वगळा; अन्यथा आंदोलन

कांदोळी, कळंगुट पीडीएतून वगळा; अन्यथा आंदोलन

Published On: Sep 02 2018 1:11AM | Last Updated: Sep 01 2018 11:58PMपणजी : प्रतिनिधी

कांदोळी  व  कळंगुटला उत्तर गोवा पीडीएतून त्वरित वगळावे. सोमवार 3 सप्टेंबर रोजी होणार्‍या उत्तर गोवा पीडीएच्या बैठकीत तसा निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कांदोळी रेसिडन्स अँड कंझ्युमर फोरमचे रोशन मथाईस यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला.

सुरुवातीपासूनच कळंगुटच्या ग्रामस्थांचा पीडीए तसेच बाह्य विकास आराखड्याला (ओडीपी) विरोध   आहे.  त्यामुळे  तो रद्द करावा अन्यथा आंदोलनाच्या परिणामांना सरकारने सामोरे जावे, असेही त्यांनी सांगितले.
माथाईस म्हणाले की, 2015 मध्ये कांदोळी व कळंगुट हे पीडीए म्हणून अधिसूचित करण्यात आले होते. याला तेथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, पीडीए अध्यक्ष तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी  ओडीपी  तयार केल्यानंतर पीडीएच्या माध्यमातून तेथील बेकायदेशीर घरे नियमित करण्यात येतील, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, या आश्‍वासनाची पूर्तता न करुन जनतेची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप माथाईस यांनी केला.
रस्त्यावरील जीवघेणे खड्डे वाढत आहेत. वीज वारंवार जात असल्याने  लोकांना अंधारात बसावे लागते. पाण्याची टंचाई गोव्यासारख्या लहान राज्यात निर्माण होते आहे. लोकांसाठी महत्त्वाच्या असणार्‍या साधनसुविधा आणि अंतर्भूत सुविधा जर राज्यात नसतील तर पीडीएचा काय फायदा, असा सवालही यावेळी त्यांनी केला.

पीडीएचा फायदा कमी व दुरुपयोगच जास्त आहे. किनारपट्टी भागात राहणार्‍या लोकांना याचा अधिक फटका बसणार आहे.  पीडीएचा फायदा हा केवळ बिल्डर लॉबीचा आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी पत्र पाठवण्यात आले. पीडीए तसेच ओडीपी त्वरित रद्द करण्याचा निर्णय सोमवारी घ्यावा, अशी मागणी माथाईस यांनी  केली.

यावेळी कांदोळी रेसिडन्स अँड कंझ्युमर फोरमचे आग्नेलो बरेटो, अँथनी डिसोझा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.