होमपेज › Goa › कामत यांच्या अटकेची गरज नाही

कामत यांच्या अटकेची गरज नाही

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 12:08AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना प्रफुल्ल हेदे खाण लीज नूतनीकरण प्रकरणात सध्या अटक करण्याचा  विचार नाही. मात्र, कामत यांना अटक करण्याचा निर्णय झालाच तर दोन दिवस आधी त्यांना त्याची माहिती देण्यात येईल, असे खाण घोटाळ्याचा तपास करणार्‍या विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात गुरुवारी प्रतिज्ञापत्राद्वारे  सांगितले.  

माजी  मुख्यमंत्री  कामत यांनी पणजी  सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवरील सुनावणीवेळी एसआयटीकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. या प्रतिज्ञापत्रात कामत यांना प्रफुल्ल हेदे खाण लीज नूतनीकरण प्रकरणात तूर्त तरी अटक करणार नसल्याचे नमूद केले आहे.

त्यामुळे कामत यांची अटकपूर्व जामीन याचिका निकालात काढण्यात आली आहे. एसआयटीला जेव्हा कामत यांच्या अटकेची गरज भासेल तेव्हा एसआयटीकडून त्यांना 48 तास अगोदर कळविण्यात येणार असल्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी कामत यांना न्यायालयात धाव घेण्याची मोकळीक असल्याचे सदर प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.