Sun, May 26, 2019 17:16होमपेज › Goa › जमिनीच्या वादातून चुलत भावाचा खून 

जमिनीच्या वादातून चुलत भावाचा खून 

Published On: Feb 25 2018 1:27AM | Last Updated: Feb 25 2018 1:17AMकाकोडा : वार्ताहर

शेळवण-केपे येथे जमिनीच्या वादातून  हेमंत देसाई याने टिकावाने वार केल्याने गंभीर जखमी झालेला त्याचा चुलत भाऊ सूर्यकांत विठोबा देसाई (वय 44, रा. शेळवण-गाववाडा) यांचा शुक्रवारी रात्री गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू  झाला. सूर्यकांतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चुलती शेवंती विष्णू देसाई हिला अटक केली असून हल्लेखोर चुलत भाऊ हेमंत देसाई हा फरार आहे. कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सूर्यकांत देसाई यांच्या घराच्या मागील बाजूस एका व्यक्तीने जमीन खरेदी केली असून त्याने शुक्रवार दि. 23 रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या जागेभोवती संरक्षक भिंत उभारणीचे 

काम चालवले होते. त्यावेळी सूर्यकांत हा गवंडी कामगारांना भिंतीचे दगड नीट बसवा, अशा सूचना देत होता. इतक्यात चुलती शेवंती तेथे आली व ‘तू कोण रे त्यांना सूचना देणारा’, असे म्हणून सूर्यकांतशी ती भांडू लागली. दोघांचा वादविवाद झाल्यानंतर सूर्यकांत घराकडे जाण्यासाठी वळला. तेवढ्यात हेमंत देसाई याने पाठीमागून सूर्यकांतच्या डोक्यात टिकावाने वार केला. त्याही स्थितीत सूर्यकांतने घरासमोर येऊन आपल्या 11 वर्षाच्या मुलीला  पाणी आणायला सांगितले. मुलीने पाणी आणि बर्फही आणून दिला. त्यावेळी घरात अन्य कुणीही नव्हते. त्यामुळे सूर्यकांतनेच आपल्या एका शेजार्‍याला फोन केला.

सरपंच सुनिता नाईक यांनाही घटनेची माहिती फोनवरून दिली असता त्यांनी पतीसह तातडीने घटनास्थळी येऊन जखमी सूर्यकांतला काकोडा सरकारी इस्पितळात नेले. तोवर अर्ध्यातासाहून अधिक काळ उलटल्याने सूर्यकांतचे बरेच रक्त वाहून गेले होते. साधारण चार वाजण्याच्या सुमारास जखमी सूर्यकांतवर उपचार सुरू करण्यात आले, सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपचार सुरू होते. जवळच्याच मंदिरात गेलेल्या सूर्यकांतची पत्नी श्रेया हिला घटनेची माहिती मिळताच तिने इस्पितळात धाव घेतली. तिने पतीला मडगाव किंवा बांबोळीत नेण्याची विनंती केली. पण त्यांची जखम मोठी नाही, त्यामुळे इतरत्र नेण्याची गरज नाही, असे सांगून उपचार सुरूच 

ठेवले. मात्र प्रकृती खालावल्याने नंतर संध्याकाळी सूर्यकांतला गोमेकॉत हलवण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्याचा  मृत्यू झाल्याचेे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हल्ला केलेले हत्यार टिकाव व संशयित अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. कुडचडे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून कलम 307 अन्वये तक्रार नोंदवून घेतली होती. मात्र सूर्यकांतला मृत घोषित केल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंदवून शेवंती देसाई हिला अटक करून तिला रिमांडसाठी केपे न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर केले. मुख्य संशयित हेमंत देसाई फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
 

कुटुंबाचा आधार हरपला 

सूर्यकांत हा काकोडा पॉलिटेक्निकमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून रात्रपाळीत काम करायचा. एकुलता एक कमावता आधार गेल्याने देसाई कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. सूर्यकांतच्या पश्‍चात वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी,  विवाहित भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. भाऊ विदेशात नोकरीला आहे.

सूर्यकांतची मुलगी घटनेची साक्षीदार 

 सूर्यकांत व त्याची काकी शेवंती यांच्यात वादावादी सुरू झाली तेव्हा घरात मुलगी श्रीशा (11) व मुलगा श्रेयांक (10) यांच्या व्यतिरिक्‍त कुणीही नव्हते. गोंधळ ऐकून श्रीशा बाहेर आली तर हेमंत आपल्या वडिलांवर टिकावाने पाठीमागून वार करत असल्याचे व आजी शेवंती ओरबाडत असल्याचे तिने पाहिले. तेथे उपस्थित कामगारही या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत, असे श्रीशाने सांगितले. देसाई कुटुंबीयांनी श्रीशाच्या जीवालाही धोका असल्याचा दावा करून तिच्या संरक्षणाची मागणी केली आहे.

आपणच खून केल्याचा शेवंतीचा जबाब

सूर्यकांतचा आपणच खून केला, असा जबाब शेवंती देसाई हिने पोलिसांसमोर दिला असून खुनाची कबुली दिली आहे. दरम्यान, या घटनेचा योग्य तपास करून गुन्हेगाराला कडक शासन करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.