Sun, Jul 21, 2019 12:44होमपेज › Goa › भरपाईच्या लेखी हमीशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही

भरपाईच्या लेखी हमीशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 11:48PM

बुकमार्क करा

काकोडा ः वार्ताहर

वेदांता खाण कंपनी जोवर नुकसान भरपाईची लेखी हमी देत नाही तोवर मनोजचा मृतदेह स्वीकारणार नाही, असे  कोडली खाण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या मनोज नाईक यांच्या  नातेवाईकांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.   कोडली येथे वेदांता कंपनीच्या खाणीत दरड कोसळून माती खाली गाडल्या गेलेल्या रिपर ऑपरेटर मनोज नाईक कलंगुटकर ( खांडेपार) चा मृतदेह स्वीकारण्यास त्याच्या नातेवाईकांनी दुसर्‍या दिवशीही नकार दिला. मनोजचे मामा आपा नाईक यांनी सांगितले, की   मयत मनोज हा रिपरवर चढण्यापूर्वी अन्य एक ऑपरेटर तो रिपर चालवत होता. मात्र,   काम करण्यास  त्याने  नकार दिला.

त्यामुळे दुसर्‍या दिवशी फोरमन अमिताभ नंदन यांनी मनोजला कटिंगसाठी त्या ठिकाणी रिपरसह पाठवले.  नंदन तेथे राहून काम पाहत असताना वरील खनिज डंप कोसळण्यास सुरुवात झाल्याने त्यांनी आपली जीप सोडून पळ काढला. मात्र मयत मनोज रिपरवरून  उडी घेण्यापूर्वीच अचानक डंप खाली आल्याने तो मातीखाली गाडला गेला.  मनोजचा मृत्यू दुर्देवी असला तरी तो कंपनीकडून खून असल्याचा आरोप त्याच्या मित्र मंडळीनी व परिवाराने यावेळी केला. मयत मनोजच्या नातेवाईकांनी वेदांत (सेसा) कंपनीवर कायदेशीर कारवाईची मागणी कुडचडे पोलिस स्थानकाचे निरीक्षक रवी देसाई यांच्याकडे केल्याने कंपनीवर गुन्हा नोंद  झालेला आहे. मात्र यातून सुटका करून घेण्यासाठी कंपनी कोणत्याही थरावर जाऊ शकते, अशी भीती  उपस्थितांनी व्यक्त केली. मयत मनोज नाईकचे मित्र   हितचिंतक व परिवारातील सदस्यांनी कुडचडे पोलिस स्थानक आवारात बुधवारी सकाळी येऊन कोडली खाण दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

डॉक्टरांअभावी शवविच्छेदन नाही डॉक्टर उपलब्ध नसल्याने मृत मनोज नाईक  यांचे शवविच्छेदन होऊ शकले नाही. आज, गुरुवारी शवविच्छेदन होईल. पोलिसांनी नुकसान भरपाईबाबत कंपनी व नातेवाईक यांच्यात मध्यस्थी करण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, वेदांताच्या जनसंपर्क अधिकारी संगीता चक्रवर्ती यांनी सांगितले, की मनोज यांच्या कुटुंबीयांशी चर्चा सुरू असून नुकसान भरपाई देण्याचा विषय लवकरच सोडविला जाईल.