Thu, Apr 25, 2019 13:24होमपेज › Goa › शेळवण खून; संशयित हेमंत देसाईला अटक

शेळवण खून; संशयित हेमंत देसाईला अटक

Published On: Mar 03 2018 1:50AM | Last Updated: Mar 02 2018 11:56PMकाकोडा  :  वार्ताहर

जमिनीच्या वादातून झालेल्या सूर्यकांत देसाई यांच्या खूनप्रकरणी  गेले सात दिवस फरार असलेल्या संशयित हेमंत सर्वेश देसाई याला कुडचडे पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास केरी-विर्डी येथील दाट जंगलातून अटक केली. दरम्यान, आपणच सूर्यकांतच्या डोक्यात टिकावाच्या दंडुक्याने वार करून त्याला मारले, असा कबुली जबाब हेमंतने दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेळवण-कुडचडे येथे गेल्या आठवड्यात शुक्रवार दि.23 फेब्रुवारी रोजी खुनाची ही घटना घडली होती. संशयिताने सूर्यकांत देसाई (वय 44) यांचा खून केला. या खूनप्रकरणी हेमंतची आई शेवंती हिला कुडचडे पोलिसांनी अटक केली होती. तर खुनाच्या घटनेनंतर हेमंत फरार झाला होता. दक्षिण गोवा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सायोनारा लाड यांच्या न्यायालयाने संशयित हेमंतचा अटकपूर्व जामीन अर्जही गुरुवारी निकालात काढला होता. कुडचडेचे पोलिस निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या     


मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हेमंतला केरी-सत्तरी येथे जंगलात पकडले. तो दोडामार्ग परिसरात घनदाट जंगलात राहात होता. हिरो होंडा आय स्मार्ट दुचाकी त्याच्याकडे होती, तिची नंबरप्लेट काढून ठेवली होती. दरम्यान, शेवंती देसाई हिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मडगाव पोलिस स्थानकातील एलसीबी गोरखनाथ गावस यांनी तसेच  कुडचडे पोलिस  स्थानकातील विशाल, अविनाश या पोलिसांनी  हेमंतला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडले. 

मृत सूर्यकांत देसाईच्या कुटुंबीयांनी सूर्यकांतचा खून करणार्‍याला अटक करावी, या मागणीसाठी बुधवारी पोलिस स्थानकासमोर धरणे धरले होते. त्यावेळी आमदार निलेश काब्राल यांनीही संशयितावर कारवाई न झाल्यास उपोषण करू, असा इशारा दिला होता.