Sat, Jul 20, 2019 09:00होमपेज › Goa › पंधरा मार्चपर्यंत खाण प्रश्‍न सोडवा

पंधरा मार्चपर्यंत खाण प्रश्‍न सोडवा

Published On: Feb 25 2018 1:27AM | Last Updated: Feb 25 2018 1:08AMकाकोडा : वार्ताहर 

काँग्रेस पक्ष खाणग्रस्तांच्या पाठीशी असून येत्या 15 मार्चपर्यंत खाण प्रश्‍न न सुटल्यास खाणग्रस्तांसोबत आपण रस्तावर उतरू, असा इशारा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी दिला आहे. खाणग्रस्तांना पाठिंबा तसेच कुडचडेतील पार्किंग व्यवस्थेसंबंधी माहिती देण्यासाठी महिला काँग्रेसने येथील काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी सावित्री कवळेकर, रजनी नाईक, बायना ब्रागांझा, ऊर्मीला नाईक, रेजिना डायस, प्रिया राठोड, प्रतिमा बोरकर, सोनिया शिरोडकर, जेसिना  मिनेझीस, रिचा ब्रागांझा, मुक्ता बांदेकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.  लिलावाद्वारे खाणींचे वाटप करण्याचा न्यायालयाचा आदेश आहे.

परंतु, असे झाल्यास खाणी गोव्याबाहेरील लोकांना मिळतील. त्यामुळे गोवेकरांना रोजगार मिळण्यास कठीण होईल. हा गोवेकरांवर अन्याय ठरेल. त्यासाठी सरकारने लवकरात लवकर खाणीसंबंधी न्यायालयात आपले म्हणणे मांडणे आवश्यक आहे. आमदारांनी गोव्यातील लोकांच्या हिताच्या दृष्टिने निर्णय घेणे आवश्यक आहे. काँग्रेस सत्ता काळात विरोधात असताना विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बेकायदेशीर खाणींच्या विरोधात विधानसभेत आवाज उठवला होता. परंतु, त्यानंतर त्यांच्या कार्यालययातच खाण अवलंबितांना जबरदस्त फटका सहन करावा लागला. आता पुन्हा भाजपच्या कार्यकाळात खाणींवर व पर्यायाने गोमंतकीय जनतेवर संकट ओढवले आहे.

या संकटावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या 15 मार्चपर्यंत सरकारने खाणीसंबंधी योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा सामान्य जनतेबरोबर आम्हीही रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कुडचडेतील पार्किंग प्रश्‍नही त्यांनी यावेळी मांडला. येथील पार्किंग व्यवस्था सुधारणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. बेशिस्त पार्किंग व्यवस्थेला पालिकाही जबाबदार आहे. त्यामुळे पार्किंग व्यवस्था सुधारण्यासाठी पालिकेने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.