Fri, Jul 19, 2019 22:59होमपेज › Goa › कदंब पठार रहिवाशांचा पाण्यासाठी ‘जलसत्याग्रह’

कदंब पठार रहिवाशांचा पाण्यासाठी ‘जलसत्याग्रह’

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 19 2017 11:54PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

कदंब पठारावरील पाणी समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  कदंब पठार रहिवाशी कृती समितीतर्फे मंगळवारी (दि.19) जल सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. कदंब पठार रहिवाशांनी सरकारी कॉलनी ते साई मंदिराच्या ठिकाणी रिकामी भांडी घेऊन दिंडी काढली. आंदोलनात शंभरहून अधिक रहिवाशी उपस्थित होते.  सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत जलसत्याग्रह  करण्यात आला. 

या सत्याग्रहाला पाठिंंबा देण्यासाठी  मेरशी पंचायतीचे सरपंच  प्रकाश नाईक, चिंबल पंचायतीचे सरपंच चंद्रकांत कुंकळ्येकर, चिंबल पंचायतीचे पंचायत सदस्य व कदंब पठारावरील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कदंब पठार रहिवाशी कृती समितीचे अध्यक्ष निलेश जोशी म्हणाले, कदंब पठारावरील रहिवाशांना सरकारकडून पाणी पुरवठ्यासंदर्भात पोकळ आश्‍वासने मिळत आहेत. मागील 20 वर्षांपासून पाण्यासाठी तेथील रहिवाशी सरकार दरबारी प्रयत्न करीत आहेत. मात्र, या प्रयत्नांना यश आलेले नाही. पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य सरकारला दि. 13 मे 2017 रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी सरकारने 17 ऑक्टोबर 2017 पर्यंत पाणीपुरवठा होईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, अजून पाणी प्रश्‍न सुटलेला नाही. सरकारकडून ही समस्या सोडविण्यासाठी कोणत्या काय उपायोजना करण्यात आल्या याची माहिती कदंब पठारावरील रहिवाशांना देण्यात आली नाही. पाणी उपलब्ध करण्यासाठी विलंब का केला जात आहे, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. कदंब पठारावरील पाणी प्रश्‍न सोडविला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी रहिवाशांतर्फे देण्यात आला.