Fri, Apr 26, 2019 20:08होमपेज › Goa › अखेर मैगीणेतून कदंब बससेवा सुरू

अखेर मैगीणेतून कदंब बससेवा सुरू

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 05 2018 1:28AMवाळपई ः प्रतिनिधी

सत्तरी तालुक्यातील गुळेली पंचायत क्षेत्रातील अनेक गावांमध्ये गव्यांच्या हैदोसामुळे   ग्रामस्थांचे जीवन धोक्यात आल्याने या गावातून कदंब  बसची सोय करावी,अशी मागणी   आंदोलनाच्या माध्यमातून  केल्यानंतर याची  दखल घेऊन  आमदार  तथा  आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी  शनिवार दि.4 ऑगस्टपासून मैगीणे गावातून कदंब बस सेवेला सुरुवात केली. 

सत्तरी तालुक्याच्या गुळेली पंचायत क्षेत्रांमध्ये गेल्या दोन महिन्यांत पूजन मेळेकर,जयंती गावकर या दोघींचा जीव गव्यांच्या हल्ल्यात गेला होता.त्यानंतर गव्यांच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी  झालेल्या आंदोलनात  शेळ मेळावली, मैगीणे, धडा पैकुळ आदी भागातून प्रवासी बसची सोय करण्याची  मागणी  ग्रामस्थांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी   कदंब महामंडळाच्या प्रवासी बसचे उद्घाटन केले .

यानिमित्त मैगीणे येथे आयोजित  समारंभात मंत्री विश्‍वजीत राणे यांनी बसचे   पूजन केले. अनेक वर्षापासून   प्रलंबित असलेली बसची मागणी पूर्ण झाल्यामुळे  ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून आता घनदाट जंगलामधून पायपीट करावी लागणार नसून यामुळे रानटी जनावरांचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

याबाबतची माहिती अशी की गेल्या दोन महिन्यापासून कणकिरे येथील जयंती गावकर ,मेळावली येथील पूजन मेळेकर यांच्या निधनानंतर ग्रामस्थांनी आक्रमकपणे अनेक वर्षापासूनची  प्रवासी बसची मागणी पूर्ण करण्याची विनंती सरकारला केली होती .याबाबत आपण गांभीर्याने लक्ष देणार असेे आश्‍वासन आमदार विश्‍वजीत राणे यांनी दिले होते.  मंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले,की याभागातील  ग्रामस्थांना वन्यपशुंमुळे  असलेल्या धोक्याबाबत सरकार गंभीर आहे.  मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पूर्ण  सहकार्य दिल्याने बस सेवा सुरू झाल्याचे राणे यांनी सांगितले.

जिल्हा पंचायत सभासद प्रेमनाथ हजारे यांनी अनेक वर्षापासून कदंबा बस सेवेची मागणी व दोन महिन्यात गव्याच्या हल्ल्यात महिलांचा गेलेला जीव याच्या पार्श्‍वभूमीवर बसची सोय उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाल्याचे  सांगितले .गुळेलीच्या सरपंच अस्मिता मेळेकर यांनी सांगितले,की आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या सहकार्यामुळे भागाच्या वेगवेगळ्या समस्या सुटत  आहेत.  

कदंब  महामंडळाचे सरव्यवस्थापक अजित देसाई,  उपसरपंच नितेश गावडे पंचायत  सदस्य अपूर्वा चारी, विठ्ठल कासकर ,अर्जुन मेळेकर, मधु गावकर,विनोद गावकर अनिल गावडे ,देवस्थानचे ज्येष्ठ नागरिक पुनो वेळीप आदींची उपस्थिती होती. सदर बस दररोज सकाळी साडेसहा वाजता मैगीणे  येथून सुटणार असून धडा मेळावली मार्गे पणजीला जाणार आहे.दुपारी तीन वाजता पुन्हा मैगीणे भागात पोहोचणार आहे .त्याचप्रमाणे रात्री आठ वाजता पुन्हा मैगीणे गावात निवासासाठी येणार असून दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहा वाजता पणजीला जायला निघणार आहे.