होमपेज › Goa › पीडितेला न्याय मिळावा : व्हिएगस

पीडितेला न्याय मिळावा : व्हिएगस

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 03 2018 11:55PMमडगाव : प्रतिनिधी 

काणकोणमधील बलात्कार घटनेमुळे  मुलीं व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. बलात्कार पीडित मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. पोलिसांनी महिन्याच्या आत बलात्कार करणार्‍या तिन्ही सुरक्षा रक्षकांसह रुबी रेसिडेन्सीच्या मालकाला अटक करून रुबी रेसिडेन्सीला टाळे ठोकावे, अशी मागणी बायलांचो एकवोटच्या अध्यक्ष आवडा व्हिएगस यांनी पत्रकार परिषदेत केले. 

व्हिएगस पुढे म्हणाल्या की, रुबी रेसिडेन्सीत घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाने गोमंतकीय हादरले आहेत. कथुआ येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाला महिनासुद्धा लोटला नाही, तोच काणकोणच्या रुबी रेसिडेन्सीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार होण्याची घटना घडली. तसेच कमकुवत बांधकाम केल्याने 2014 साली रुबी रेसिडेन्सी इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत सुमारे 30 जणांना आपले प्राण गमावावे लागले होते. सदर रेसिडेन्सी नेहमीच वादग्रस्त ठरली असून आता याच ठिकाणी सहा वर्षीय मुलीवर बलात्कार होण्याची घटना घडली. या रेसिडेन्सीत काम करणार्‍या तीन सुरक्षा रक्षकांनी सलग तीन महिने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. परिसरातील कोणालाच या प्रकाराची जराही कल्पना नव्हती हे एकूण आश्‍चर्य वाटल्याचे व्हिएगस म्हणाल्या.

2014 साली रुबी रेसिडेन्सीच्या बांधकामासाठी अनेक परप्रांतीय कामगार काणकोणमध्ये आले होते. याच कामगारांपैकी एकाच्या सहा वर्षीय मुलीचे तीन महिने शारीरिक शोषण करून तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना गेल्याच आठवड्यात समोर आली. या रेसिडेन्सीमध्ये होणार्‍या प्रत्येक घटनेची दखल मालकाने घ्यायला हवी होती. मात्र, मालक व कंत्राटदाराने मिळून हे प्रकरण दडपल्याचे त्या म्हणाल्या. अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार घृणास्पद असून आरोपींना तसेच हे प्रकरण दडपणार्‍यांना कठोर शिक्षा व्हावी, असेही व्हिएगस म्हणाल्या.

कायद्यानुसार एखाद्याच्या मालकीच्या जागेत गुन्हा घडल्यास संबंधित मालकाने या प्रकरणाची तक्रार पोलिसांत करायला हवी. मात्र, काणकोणमधील बलात्कार घटनेत असे काहीच झाले नाही. गोव्यात येणारी प्रत्येक व्यक्‍ती राज्य सरकारची जबाबदारी असून सरकारने गोमंतकीयांबरोबरच परप्रांतीयांच्या सुरक्षिततेची तितकीच काळजी घ्यावी. कोणत्याही कामासाठी ज्यावेळी इतर राज्यांतून कामगार आणले जातात त्यावेळी त्यांची योग्य चौकशी करून त्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व सुविधा उपलब्ध करणे आवश्यक असते.  मोठे बिल्डर्स व कंत्राटदारांना कामगारांच्या सुरक्षेविषयी काहीच देणेघेणे नसते. आपले काम पूर्ण व्हावे, हाच त्यांचा हेतू असतो, असेही व्हिएगस यांनी सांगितले. 

Tags : Goa, Justice, should, given