Sun, Oct 20, 2019 01:08होमपेज › Goa › मडगाव जिल्हाधिकारी इमारतीत न्यायालयीन कामकाज ठप्प

मडगाव जिल्हाधिकारी इमारतीत न्यायालयीन कामकाज ठप्प

Published On: Aug 08 2018 1:49AM | Last Updated: Aug 08 2018 1:49AMमडगाव : प्रतिनिधी

मडगाव येथील माथानी साल्ढाणा संकुलात मंगळवारी (दि. 7) वीज पुरवठा वारंवार खंडित होत राहिल्याने उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात चालणारे न्यायालयीन खटल्यांचे कामकाज तहकूब करावे लागले. लिफ्ट बंद पडल्याने काही लोक अर्धा तास लिफ्टमध्ये अडकून पडले.

माथानी साल्ढाणा संकुलातील वीजपुरवठा मंगळवारी वारंवार खंडित होत होता. सकाळी दहा वाजता संकुलातील सर्व कार्यालये उघडताच वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार समोर आला. अकरा वाजता वीज गुल झाली होती ती सायंकाळी पावणेपाच वाजता सुरळीत झाली. सायंकाळी कार्यालयांचेकामकाज बंद करतेवेळी वीज आल्यामुळे कर्मचार्‍यांना दिवसभरात काहीच काम करता आले नाही.

उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई यांना विचारले असता सायंकाळी पाचच्या दरम्यान वीज पुरवठा सुरळीत झाल्याचे ते म्हणाले. वीज वारंवार जात असल्याने संगणकाचा बॅकअपसुद्धा जात होता. त्यामुळे न्यायालयीन कामकाजावर त्याचा परिणाम झाला  अशी माहिती त्यांनी दिली. प्रभुदेसाई यांच्या न्यायालयीन कामकाजाबरोबर इतर न्यायालयातील कामकाजसुद्धा तहकूब करण्यात आले. लोकांना बर्‍याचा अडचणींचा सामना करावा लागला. अर्ध्या इमारतीला सिंगल फेज वीजपुरवठा होत होता. पण त्यातून कोणतेही कार्यालयीन कामकाज होऊ शकले नाही.लिफ्टसुद्धा पुन्हा-पुन्हा बंद पडत होती. पण लिफ्ट चालणार नाही याची कल्पना संकुलच्या प्रशासनाने लोकांना न दिल्याने लोक लिफ्टचा वापर करत होते. दुपारी अचानक वीज गेल्याने लिफ्ट अर्ध्यावर बंद पडली; त्यात तीन लोक अडकून पडले होते. अर्ध्या तासाने लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले.

वीज पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरचा पर्याय उपलब्ध आहे पण जनरेटर चालवण्यासाठी एका तासाला साठ ते सत्तर लिटर डिझेलची आवश्यकता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिझेल संपल्यामुळे जनरेटर चालू शकले नाही. प्राप्त माहितीनुसार गेल्या आठवड्यातसुद्धा लोक लिफ्टमध्ये अडकून पडल्याच्या घटना घडल्या होत्या. महसूलमंत्री खवंटे यांनी जुलै महिन्यात या संकुलाला भेट देऊन विस्कळीत होत चाललेल्या सर्व सेवा सुरळीत केल्या जाणार असल्याचे सांगितले होते पण अजून जिल्हाधिकारी इमारतीची तीच अवस्था असून लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.