Mon, May 27, 2019 00:38होमपेज › Goa › झुवारी पूल सुरक्षित : मंत्री सुदिन ढवळीकर

झुवारी पूल सुरक्षित : मंत्री सुदिन ढवळीकर

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 04 2018 1:17AMपणजी : प्रतिनिधी

झुवारी पूल सुरक्षित असून त्याची पाहणी तसेच देखभाल नियमितपणे केली जात आहे. नवा झुवारी पूल डिसेंबर 2019 मध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री  सुदिन ढवळीकर यांनी आल्तीनो येथील आपल्या शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

जुन्या मांडवी पुलाची तत्कालीन काँग्रेस सरकारने योग्य ती देखभाल न केल्यानेच तो कोसळला होता. झुवारी पूल सुरक्षित नसल्याचे  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे विधान निषेधार्ह असल्याची टीकाही  ढवळीकर यांनी केली.

ते म्हणाले की,  झुवारी पूल हा असुरक्षित असल्याचे चोडणकर यांचे विधान म्हणजे जनतेमध्ये घबराट पसरवण्याचा प्रयत्न आहे.  तत्कालीन काँग्रेस सरकारने 2008 साली नव्या झुवारी पुलाची पायाभरणी केली तरी प्रत्यक्षात त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली नाही. भाजप सरकारने सत्तेत येताच नव्या मांडवी, झुवारी पुलाच्या कामास सुरुवात करण्याबरोबरच रस्त्यांचा दर्जा सुधारण्याकडेही लक्ष पुरवले आहे. 

1983 साली झुवारी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या पुलाला 35 वर्षे पूर्ण झाली. झुवारी पूल व त्यावरून वाहतूक करणार्‍यांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असून, या पुलाची देखभाल तसेच पाहणी करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या प्रोफेसरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून नियमितपणे त्याच्या देखभालीचे काम हाती घेण्यात येते. या पुलावरुन कार आणि दुचाकीसह  केवळ 16.5 टन प्रवासी बसेसना वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. वेगमर्यादेवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेराही बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

झुवारी पुलाच्या पाच व सहाव्या खांबाचे काम हाती घेण्यात आले होते.  नवा झुवारी पूल हा आठ पदरी असून पैकी चौपदरी पूल डिसेंबर 2019 पर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाईल. नवा पूल वाहतुकीस खुला करताच जुन्या पुलाचा स्लॅब पाडून त्याजागी नवा स्लॅब बसवण्यात येईल व त्यावरुनही वाहतूक सुरु ठेवली जाणार आहे. पाटणा-बिहार येथे अशा प्रकारे प्रयोग करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता व आपण स्वत: जाऊन त्याची पाहणी करणार असल्याचे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

बोरीत लवकरच नवा चौपदरी पूल

बोरी येथे नवा चौपदरी पूल उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा पूल  उभारला जाणार असून, त्यासंदर्भातील फाईल संमत करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. सध्याचा बोरी पूल 13 कोटी रुपये खर्च करून सशक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक मतदारसंघात 15 कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचे हॉटमिक्सिंग केले जाणार आहे. आतापर्यंत 718 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.