होमपेज › Goa › ‘जायका’ जलवाहिनी देवळामळ येथे फु टली

‘जायका’ जलवाहिनी देवळामळ येथे फु टली

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 17 2018 11:27PMमडगाव : प्रतिनिधी

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या आणि केवळ दोन वर्षांपूर्वीच कार्यान्वित झालेल्या शेळपे सांगे येथील जायका पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची जलवाहिनी देवळामळ सांगे येथे फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होण्याबरोबर सासष्टी तालुका व वास्को शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून ही जलवाहिनी दुरुस्ती होईपर्यंत जुन्या पर्यायी जलवाहिनीतून मर्यादित पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न असेल, असे सूत्रांनी सांगितले.सासष्टी तालुका व वास्को शहराला पाणी पुरवठा करणारी ही जलवाहिनी कार्यान्वित झाल्यापासून दुसर्‍यांदा फु टली आहे.

जलवाहिनीच्या पाण्याचा वेग नेहमीप्रमाणे जास्त होता. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवळामळ येथे जलवाहिनीच्या जॉईंटचे वेल्डिंग सुटून जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी बाहेर फेकले गेले.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग बाराचे सहाय्यक अभियंते अनंत गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वाहिन्यांना जोडण्यासाठी  वेल्डिंग मारण्यात आले होते. पाण्याच्या दाबाने वेल्डिंग सुटल्याने हा प्रकार घडल्याचा दावा त्यांनी केला. सुदैवाने हा परिसर लोकवस्तीपासून दूर असल्याने मोठा अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया स्थानिक लोकांनी व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष पाहणार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी एकच्या दरम्यान जलवाहिनी असलेल्या भागात मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला. लोकांनी त्याकडे धाव घेतली असता जलवाहिनी फुटून त्यातून सुमारे दहा ते पंधरा मिटर उंच पाण्याचे फवारे उडत असल्याचे दिसून आले. बांधकाम खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी त्याठिकाणी पोहचेपर्यंत वीस मिनिटे ते अर्धा तास पाणी तसेच वाहत होते.

सदर वाहिनी दुरुस्त करण्याचे काम जोरात सुरू आहे. रात्रभर हे काम पूर्ण करून बुधवारी पहाटे पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती गावकर यांनी दिली.सविस्तर वृत्ताप्रमाणे दोन वर्षांपूर्वी शेळपे येथे जायकाचा जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला होता. या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. प्रकल्प सुरु झाल्यानंतर या नवीन वाहिनीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. पण अवघ्या काही महिन्यांतच ही जलवाहिनी फुटली होती. जलवाहिनी फुटण्याची ही दुसरी घटना असून पुन्हा-पुन्हा वाहिनी फुटू लागल्याने वाहिनीच्या दर्जाविषयी  शंका उपस्थित केली जात आहे.

मर्यादित प्रमाणावर पाणीपुरवठा

वाहिनी फुटल्याचे समजताच पाणीपुरवठा थांबविण्यात आला आणि दुरुस्ती काम सुरू करण्यात आले. ही वाहिनी थेट मडगाववरून वेर्णा येथे पंप हाऊसपर्यंत नेण्यात आलेली आहे. वाहिनीतून पंप हाऊसपर्यंत पाणी नेऊन ते वास्कोत पुरवले जाते. जलवाहिनी फुटल्याने सालसेत व वास्को भागात पाणी पुरवठा खंडित झाला. पण दुसर्‍या वाहिनीतून पाणी सोडल्याने मर्यादित प्रमाणावर पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती सहा. अभियंता गावकर यांनी दिली.