पणजी : प्रतिनिधी
गोमंतकीयांनी थोड्याशा फायद्यासाठी वडिलोपार्जित जमिनींची विक्री न करता त्या जमिनीत शेती किंवा शेती पूरक व्यवसाय करावेत. गोव्यात शेजारील राज्यांतून भाजीपाला व कृषी माल आणण्याऐवजी स्थानिकांनी स्वत:चे कृषी उत्पादन बाजारात आणल्यास ते फायद्याचे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी मिनेझीस ब्रगांझा सभागृहात ‘अॅडवेन्त्झ ग्रुप’ आणि ‘झुआरी अॅग्रो केमिकल्स कं.’ द्वारे संयुक्तरित्या आयोजित ‘युथ फॉर टुमारो 2017’ या उपक्रमात केले. यावेळी शेतकर्यांसाठीच्या ‘जय किसान’ अॅपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमानुसार, जय किसान अॅपद्वारे शेतकर्यांसाठी शेती व पूरक व्यवसायाची माहिती उपलब्ध केली जाईल. खत उत्पादन करणार्या कंपन्यांसमवेत शेतकर्यांचा संपर्क वाढविण्यास अॅपमुळे मदत होईल. शेतकर्यांना आवश्यक असलेल्या विविध महत्त्वाच्या कृषी सेवा आणि तज्ज्ञांशी थेट संपर्क साधता येेणार आहे. सध्या या अॅपद्वारे राज्यातील सुमारे 70च्या आसपास शेतकरी जोडले गेले असून येत्या दोन वर्षांत सुमारे 10 हजार शेतकरी जोडले जातील, असा विश्वास ‘झुआरी ग्लोबल लि. कं.’ व्यवस्थापकीय संचालक सुरेश कृष्णन यांनी सांगितले.
तीन दिवसीय ‘युथ फॉर टुमारो’ उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष असून यंदा कृषी-नाविन्यतेला अडवेनत्झचे प्रोत्साहन (अॅडवेन्त्झ सेलिब्रेट्स अॅग्री-इनोवेशन) अशी या उपक्रमाची संकल्पना आखण्यात आली आहे. यंदा दि. 13 ते 17 वर्षे वयोगटातील शासकीय, अनुदानित, खासगी अशा 25 हून अधिक शाळांमधील विविध शाखांतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.