Tue, Apr 23, 2019 20:25होमपेज › Goa › म्हादईचे पाणी कर्नाटकाला देणे अपरिहार्य

म्हादईचे पाणी कर्नाटकाला देणे अपरिहार्य

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 11:55PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

म्हादई नदीचा 35 किलोमीटर्सचा प्रवाह हा कर्नाटकातून, 16 किलोमीटर्सचा प्रवाह  महाराष्ट्रातून जातो आणि 52 किलोमीटर्सचा प्रवाह गोव्यातून जातो. यामुळे म्हादईच्या पाण्याचे गोवा व कर्नाटक यांच्यात वाटप होणे हे अपरिहार्य व अटळ आहे. लवादाच्या निवाड्यातही तसेच अपेक्षित आहे. जर कुणाला पाणी वाटप शक्यच नाही, असे वाटत असेल तर ते ‘मुर्खाच्या नंदनवना’त राहतात, असेच म्हणावे लागेल, असे सांगून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी म्हादईप्रश्‍नी आपली भूमिका स्पष्ट केली.

पर्वरी येथील सचिवालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पर्रीकर  म्हणाले, की आपण कर्नाटकाला म्हादईप्रश्‍नी पत्र पाठविताना गोव्याच्या हिताचा विचार केला आहे. आपले भाजप नेते येडियुरप्पा यांना लिहलेले पत्र हे अतिशय योग्य  व काळजीपूर्वक लिहिलेले आहे. हे पत्र लिहिण्यापूर्वी आपण निर्मला सावंत व राजेंद्र केरकर यांच्याशीही बोललो होतो. मात्र काहीजण त्या पत्रामधील मजकुराचा विपर्यास करत आहेत.

म्हादई नदीचा प्रवाह कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातून जातो. ज्या भागातून नदी जात असते, त्या भागातील राहिवाशांना पाणी मिळणार नाही, असे म्हणता येणार नाही. मात्र नदीचे पाणी एका खोर्‍यातून दुसर्‍या खोर्‍यात वळविता येणार नाही.  म्हादईच्या खोर्‍यात सुमारे 115 टीएमसी पाणी उपलब्ध असून तीन राज्यांची पाण्याची गरज 145 टीएमसी इतकी आहे. याचा अर्थ म्हादई नदीत पाणी कमी असून ते दुसर्‍या नदीत वळवता येणार नाही. म्हादईत पुरेसे पाणी नाही, आणि  तरीही 75 टक्के गोवा या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. यासाठीच म्हादई नदीचे पाणी वळविण्याला गोव्याने विरोध केला आहे. मात्र म्हादई खोर्‍यातील पाणी पिण्यासाठी आणि त्याच खोर्‍यात वापर करण्याला आमची हरकत नाही.

मुख्यमंत्री म्हणाले, की म्हादई नदीतील पाण्याचे वाटप हे होणारच आहे. ते अपरिहार्य आहे. ज्याला कायदा समजतो, त्याला तरी ते निश्‍चितच कळून येईल. लवादाच्या निवाड्यातही म्हादईचे पाणीवाटप करावे, असा निष्कर्ष असू शकतो. गोव्यातील ज्या 21 संस्था व स्वयंसेवी संघटना म्हादईप्रश्‍नी सध्या संघटित होऊन लढू पाहत आहेत, त्यातील बहुतेकजण हे ‘नाटकातील नेहमीचेच कलाकार’ आहेत. या संघटनांनी आपल्याला म्हादईप्रश्‍नी एकही पत्र अजूनपर्यंत लिहिलेले नाही, त्यांनी या प्रश्‍नी जनतेसमोर जावेच.

सिद्धरामय्यांना पत्रोत्तरास  बांधील नाही : मुख्यमंत्री

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पत्र आपणास मिळाले आहे व आपण ते पत्र जलस्रोत खात्याकडे पाठवून दिले आहे,असे  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. ते म्हणाले,  सिद्धरामय्या हे तीन राज्यांमध्ये त्रिपक्षीय बैठक कधी घेऊया, असे पत्राद्वारे विचारतात , तसेच ते म्हादईचे पाणी वळविण्याची भाषाही पत्रात करतात.ते आपण लिहिलेल्या पत्रातील मुद्यांशी संबंधित  बोलत नसल्याने आपण त्यांना उत्तर देण्याला बांधील नाही. आपण लिहिलेल्या पत्राचा वापर करून कर्नाटकात राजकीय नेते जर आश्‍वासने देत असतील, तर त्याला आपण जबाबदार नाही,असेही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.