Tue, Mar 19, 2019 20:56होमपेज › Goa › जनतेची मने जिंकल्यास निवडणूक जिंकणे सोपे

जनतेची मने जिंकल्यास निवडणूक जिंकणे सोपे

Published On: May 05 2018 12:49AM | Last Updated: May 05 2018 12:04AMपणजी : प्रतिनिधी

गोव्याच्या राजकारणाची दिशा राजकारणी ठरवत नसून सामान्य नागरिक ठरवतात. राजकारणाचा अभ्यासक्रमच आता जनता ठरवत असून यासाठी काँग्रेसने तळागाळातील जनतेचे प्रश्‍न घेऊन लढा उभारला पाहिजे. लोकांची मने जिंकणारे नेतेच निवडणुका जिंकत असल्याने काँग्रेस आता निवडणुकीपुरती जागी न होता जनतेच्या समस्या जाणून घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहे, असे  प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा ताबा शुक्रवारी माजी अध्यक्ष शांताराम नाईक यांनी चोडणकर यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते.काँग्रेसचे सुभाष शिरोडकर वगळता सर्व विद्यमान आमदारांनी तसेच माजी नेत्यांनी हजेरी लावली. चोडणकर यांना शुभेच्छा देण्यासाठी गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी खासदार मिलिंद देवरा, गुजरातचे प्रभारी तथा खासदार राजीव सातव, खासदार अमित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. 

चोडणकर म्हणाले की, एक साधा बूथ कार्यकर्ता प्रदेशाध्यक्षपद भूषवतो, हे फक्‍त काँग्रेसमध्येच शक्य असल्याचे आपल्या स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध होते. भाजपमध्ये सर्व नेमणुका फक्त संघाच्या मार्गदर्शनातून होतात. कार्यकर्ता म्हणून काम करताना किती कष्ट पडतात, याची आपल्याला जाणीव असल्याने आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून न मिरवता साध्या कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करणार आहे. आपल्याला तिकीट मागण्यासाठी पक्ष कार्यालयात गर्दी करणारे नेते नकोत, तर पक्षकार्य पुढे नेण्यासाठी पद मागणार्‍या कार्यकर्त्यांची गरज आहे. आपण तळागाळात पक्ष बांधणी बळकट करण्याला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. यासाठीच यापुढे आपले छायाचित्र पक्षाच्या कोणत्याही फलकावर लावणार नसून पक्षाचे चिन्ह ‘हात’ जनतेसमोर ठेवणार आहे.  सध्या काँग्रेस पक्षाला विरोधकाचे काम अधिक जोमाने आणि विधायकरितीने करावे लागणार असून सरकारच्या फसव्या आश्‍वासनांवर संतप्त झालेल्या लोकांनीच येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. 

गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार म्हणाले की, राज्यातील खाणींचा लिलाव न करता चुकीच्या पद्धतीने त्या खुल्या केल्याने खाण अवलंबितांना अतोनात त्रास सहन करावा लागला. सर्वोच्च न्यायालयानेही नव्याने खाणबंदी लागू केल्याने लोक अडचणीत आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आता 13 मे रोजी गोव्यात येत असून त्यांना गोमंतकीयांनी भाजपने केलेल्या फसवसणुकीचा जाब विचारावा. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, माजी प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक, आमदार दिगंबर कामत, लुईझिन फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड, निळकंठ हळर्णकर, रवी नाईक यांचीही भाषणे झाली.  या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.  चोडणकर यांनी कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्याची सूचना दिली तरी उत्साही कार्यकर्त्यांनी भला मोठा गुलाबाचा पुष्पहार  घालून तसेच केक कापल्याने चोडणकर यांनी त्यांना कानपिचक्या दिल्या. 

‘निवडणुकांसाठी सज्ज रहावे’ 

ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे म्हणाले की, भाजपने काँग्रेसचा तोंडचा घास पळवला आहे, तो परत मिळवण्यासाठी पक्षाने आता निश्‍चय केला पाहिजे. सत्ता पुन्हा काँग्रेसकडे येण्याची पक्षाने संयमाने वाट पाहिली असून आता हा संयम संपला आहे. चोडणकर यांनीही, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कधीही निवडणुका होतील, असा अंदाज गृहीत धरून जनतेपर्यंत पोचण्याचे आवाहन केले.

Tags : Goa, easy, win, election, you, win, votes, people