Sun, Jan 20, 2019 16:30होमपेज › Goa › सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांची चौकशी करा 

सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांची चौकशी करा 

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 05 2018 1:28AMपणजी : प्रतिनिधी

सामाजिक सुरक्षा योजनांतून 550  कोटी रुपयांचा राज्य सरकारला तोटा झाल्याचे विधानसभेत मांडण्यात आलेल्या ‘कॅग’ अहवालातून  स्पष्ट झाले आहे.  या योजनेचा कुणी लाभ घेतला ? हे कळायला हवे. त्यामुळे  योजनेअंतर्गत पैसे घेतलेल्या सर्व लाभार्थ्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते एल्विस गोम्स यांनी पत्रकार परिषदेत केली. 

गोम्स म्हणाले,  ‘कॅग’ चा अहवाल हा दोन ते तीन वर्षे पूर्वीचा असतो. त्यामुळे आजपर्यंतचा तोटा लक्षात घेतला तर तो एक हजार कोटींहून अधिकचा असू शकेल. या पैशांचा लाभ गरज नसलेल्या लोकांना  फसवणुकीद्वारे  देण्यात आला आहे, असा संशय गोम्स यांनी व्यक्‍त केला. 

सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत असणारा निधी गरिबांसाठी वापरण्यात येतो. परंतु, हे पैसे फसवणूक करून आपापल्या कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. या कित्येक कोटी रुपयांच्या तोट्याबाबत संबंधित  दोषींवर कारवाई व्हायला हवी. यावर कुणी कारवाई करत नाही आणि एका दिवशी असाच कोट्यवधी रुपयांचा तोटा म्हणून अहवाल सादर केला जातो. सखोल चौकशी करून  पैशांचा लाभ कुणाला झाला, याचा अहवाल सरकारने सर्वांसमोर ठेवावा, असेही  गोम्स यांनी सांगितले. 

‘आप’चे प्रवक्ते सिध्दार्थ कारापूरकर म्हणाले, विधानसभेत  1 कोटी स्क्वेअर मीटर्स क्षेत्रफळाच्या भूखंडांचे  रूपांतरण  झाल्याचे सांगण्यात आले.  हे सर्व बेकायदेशीर असल्याचे माहीत असतानाही  सरकारने या विरोधात काहीच कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे. या विषयी लोकांनी तक्रारी करूनही अधिकार्‍यांनी काही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे लोकांना न्यायालयात जावे लागले आहे. असेच न्याय मागण्यासाठी लोकांना न्यायालयात जावे लागले तर सरकार कशासाठी आहे? असा प्रश्‍न कारापूरकर यांनी उपस्थित केला.