होमपेज › Goa › पणजी पोलिस निरीक्षकांची चौकशी करा 

पणजी पोलिस निरीक्षकांची चौकशी करा 

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 1:17AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

येथील कदंब बसस्थानकावर गेल्या आठवड्यात कदंब कर्मचार्‍यांकडून   खासगी बसचालक व वाहकाला मारहाण झाली. पोलिसात तक्रार करून देखील  दोषींवर कारवाई  करण्यास पणजी पोलिस अपयशी ठरले आहेत.   या प्रकरणी पणजी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व उपनिरीक्षकांची चौकशी व्हावी,   अशी मागणी अखिल गोवा खासगी बसमालक  संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी बुधवारी  पत्रकार परिषदेत केली. या संबंधी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक तसेच पोलिस इस्टॅब्लीशमेंट बोर्डकडे  संघटनेकडून निवेदन  सादर करण्यात आले आहे, असे ताम्हणकर  यांनी सांगितले.

ताम्हणकर म्हणाले,  की कदंब बसचालकाकडून खासगी बसचालक व वाहकाला दि.11  जानेवारी रोजी पणजी बसस्थानक  परिसरात  सकाळी मारहाण करण्यात आली होती. याविरोधात खासगी बसचालकांनी  पणजी पोलिसांत  तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी त्याची दखल घेतली  नाही. त्यानंतर दि. 12  जानेवारी रोजी  देखील असाच प्रकार घडला. परंतु तरीही पणजी पोलिसांनी काहीच कारवाई  केली नाही. याचा परिणाम म्हणून दि. 13 जानेवारी रोजी   राज्यातील सर्व खासगी बसचालकांनी  बंद पुकारला. खासगी बसचालकाला मारहाण केल्याप्रकरणी कदंब कर्मचार्‍यांविरोधात पोलिसांनी त्वरित कारवाई करणे अपेक्षित होते. उलट त्यांनी  तीन दिवस काहीच कारवाई केली नाही.

पणजी पोलिस ठाण्याचे निरीक्षक  व उपनिरीक्षकांनी या मारहाण प्रकरणी पहिले तीन दिवस कारवाई का केली नाही याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था सध्या बिघडली असून   सामान्य व्यक्तीला न्याय मिळत नसल्याचे हे  उदाहरण आहे. पोलिस खात्याकडे  60 रॉबर्ट वाहने असून त्यांच्याकडून गस्त घातली जाते. प्रत्येक पोलिस स्थानकाला रॉबर्ट वाहने दिली आहेत. दर महिन्याला  या वाहनाला प्रत्येकी  230 ते 235 कॉल्स येतात. परंतु  गुन्हे रोखण्यासाठी त्यांचा किती वापर होतो, याची  गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तसेच पोलिस महासंचालकांनी चौकशी करावी, असे ताम्हणकर म्हणाले.