Tue, Apr 23, 2019 13:35होमपेज › Goa › आंतरराज्य बसस्थानक कचर्‍याच्या गर्तेत

आंतरराज्य बसस्थानक कचर्‍याच्या गर्तेत

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:29AM

बुकमार्क करा
पणजी : तेजा आरोंदेकर

राजधानी पणजीतील आंतरराज्य बसस्थानक सध्या कचर्‍याच्या गर्तेत सापडले आहे. राजधानीत येणार्‍या पर्यटकांना या कचर्‍यावरुनच चालत जावे लागत आहे. बसस्थानकावर असलेल्या स्वच्छतागृहांचीदेखील दयनीय अवस्था झालेली आहे.यावर संबंधितांनी उपाययोजना करावी, अशी मागणी लोकांतून होत आहे.

कदंब बसस्थानकामागे नवीनच उभारण्यात आलेल्या आंतरराज्य बसस्थानकावर सर्वत्र कचरा पसरलेला दिसत आहे. प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, चिप्स पॅकेट, शीतपेयांच्या बाटल्या बसस्थानकावरच फेकण्यात आलेल्या आहेत. बसगाड्या पार्क केल्या जातात त्याचठिकाणी कचरा फेकण्यात आलेला आहे.

राजधानी पणजी एका बाजूने स्मार्ट सिटीच्या दिशेने पावले टाकत आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा कचरामुक्त करण्याची घोषणा केली आहे. मात्र, आंतरराज्य बसस्थानकावर वेगळेच चित्र दिसत आहे. पर्यटक आंतरराज्य बसस्थानकाचे किळसवाणे चित्र स्वत: बरोबर घेऊन जात आहे.

आंतरराज्य बसस्थानकावर महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह आहे. मात्र, बसस्थानकावर असलेल्या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झालेली आहे. स्वच्छतागृहांना दरवाजे नाहीत आणि ज्या स्वच्छतागृहांना दरवाजे आहेत ते पूर्ण तुटले आहेत. काही स्वच्छतागृहांमध्ये कचरा टाकण्यात आला आहे. स्वच्छतागृहाच्या लाद्या तुटलेल्या आहेत. प्रवशांनाा स्वच्छतागृह शोधत कदंब स्थानकाकडे जावे लागते. स्वच्छतागृह उभारुन त्याची देखभाल न केल्याने प्रवाशी नाराजी व्यक्त करीत आहेत.

आंतरराज्य बस चालवणार्‍या एका वाहन चालकाने सांगितले, की प्रवाशांबरोबरच वाहनचालक, वाहक यांना स्वच्छतागृहांअभावी त्रास सहन करावा लागतो. बसस्थानकावर उभारलेल्या सुविधांची देखरेख करणे आवश्यक होते.