पणजी : प्रतिनिधी
‘ब्रेनडेड’ व्यक्तीच्या अवयव प्रत्यारोपणाचा लाभ गोमेकॉतील रुग्णांऐवजी परराज्यातील रुग्णांना दिल्याच्या शुक्रवारच्या प्रकाराची आरोग्य खात्याने गंभीर दखल घेतली आहे. मुत्राशय हवे असलेल्या गोमेकॉतील रुग्णाला संबंधित ब्रेनडेड रुग्णाचे मुत्राशय मिळवून देण्यात अपयश आल्याप्रकरणी डॉक्टर व अधिकार्यांच्या विशेष पथकामार्फत चौकशी करून 48 तासांत अहवाल सादर करण्याचा आदेश आपण दिला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे.
दोनापावला येथील मणिपाल इस्पितळातील एक रुग्ण ‘ब्रेन डेड’ झाल्यानंतर कुटुंबीयांच्या परवानगीने त्यांच्या अवयवांचा मुंबईतील तीन रुग्णांना रोपणद्वारे लाभ झाला होता. राज्यात अनेक रुग्ण अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असताना गोव्यातील रुग्णाचे अवयव प्रत्यारोपणासाठी खास ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करून विशेष चार्टर विमानाने मुंबईत नेण्यात आले. मात्र, गोमेकॉतील एका रुग्णासाठी मुत्राशय रोपण करण्यास स्थानिक आरोग्य प्रशासनाला अपयश आल्याबद्दल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी नाराजी व्यक्त करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.
आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, राज्यातील मणिपाल इस्पितळाला अवयव प्रत्यारोपणाचे अधिकार नसले तरी एका रुग्णाचे अवयव ‘हार्वेस्टिंग’ करण्यात त्यांना यश मिळाले. राज्यातील पहिल्याच आंतरराज्य अवयव प्रत्यारोपणासाठी ‘रिजनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्स्प्लांट ऑर्गनायजेशन’च्या (रोटो) मुंबईच्या अधिकार्यांकडून आपत्कालीन विनंती आल्याने राज्य आरोग्य खात्याच्या सचिवांनी परवानगी दिली होती. मात्र, याचबरोबर गोमेकॉतील रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असतानाही ही सोय करता आली नसल्याचे आपल्याला वाईट वाटले. हल्लीच गोमेकॉच्या दोन रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती.
‘रोटो’ च्या नकाराबाबत चौकशी करणार
गोव्यातील ‘ब्रेन डेड’ रुग्णांकडून मिळालेल्या अवयवाचे प्रत्यारोपण परराज्यात करणे शक्य झाले. मात्र गोमेकॉसारख्या देशातील अग्रगण्य आरोग्य संस्थेला या तीन अवयवांपैकी किमान एक मूत्राशय मिळणे शक्य झाले नाही. यामुळे आपण गोमेकॉच्या डॉक्टरांकडून राज्यातील रुग्णाला अवयव रोपणाचा लाभ का झाला नाही, याविषयी सखोल चौकशी करून शुक्रवारपर्यंत अहवाल देण्याचा आदेश दिला आहे. ‘रोटो’ने गोव्याला एक मूत्राशय देण्यास का नकार दिला, याचीही चौकशी करण्यात येणार आहे. यासंबंधी सोमवारीच आपण गोमेकॉच्या डॉक्टरांची महत्वाची उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यात चौकशीचा आदेश करण्यास सांगितले आहे, असे आरोग्यमंत्री राणे म्हणाले.
‘सोटो’ची स्थापना का नाही?
गोव्याला स्थानिक रुग्णांकडून अवयव प्रत्यारोपणाचा लाभ का मिळाला नाही, अशी विचारणा आपण प्रशासनाला केली असून सदर राज्यात राज्यस्तरीय ‘स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्स्प्लांट ऑर्गनायजेशन’ची (सोटो) स्थापन करण्यास आपल्याला अपयश का आले, अशी विचारणाही केल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले. आरोग्य खात्याच्या अधिकार्यांनी का अंधारात ठेवले, या निष्काळजीपणाला कोण जबाबदार आहे, याचीही आपण विचारणा केली आहे, असेही ते म्हणाले.
Tags : Goa, Interstate, Organ, Transplant, Deals, Dispute