Sun, Sep 23, 2018 04:36होमपेज › Goa › गोव्याशी आंतरिक नाते : अमिताभ बच्चन

गोव्याशी आंतरिक नाते : अमिताभ बच्चन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गोवा हा नेहमीच आपल्या  हृदयात  असून गोव्याशी आपले आंतरिक नाते आहे. आपल्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्थानी’चे चित्रीकरण गोव्यात झाले. यासाठीच गोमंतभूमी आणि गोमंतकीयांविषयी आपल्या मनात नेहमीच आदर व गोड स्मृती जपलेल्या आहेत, असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केले. 

48 व्या इफ्फीचा शानदार समारोप सोहळा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर मंगळवारी पार पडला. या सोहळ्यात बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2017’ने  केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि अभिनेता अक्षयकुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा सन्मान स्वीकारल्यानंतर बच्चन बोलत होते. 

अमिताभ म्हणाले की, भारताच्या महाकाय सिनेसृष्टीतील आपण एक लहानसे मात्र अभिमानी कलाकार आहोत. अंधार्‍या प्रेक्षागृहात आपण सर्व प्रेक्षक म्हणून चित्रपटाचा आनंद लुटताना शेजारील माणसाचा धर्म, जात, पात, भाषा व रंग विसरतो. एखाद्या गमतीशीर प्रसंगात आपण एकत्र हसतो, भावूक प्रसंगामुळे डोळ्यात आसवं येतात, एकाच सुरात एखादे गाणे गातो. वेगवान व सदैव धावत्या अशा जगात माणुसकीचे बंध आपण जागतिक सिनेमासृष्टीत एकत्र जपतो. 

धन्यवाद हा लहान शब्द आहे, त्यातून आपली सर्व भावना व्यक्‍त करू शकत नाही, असे  सांगून आपल्याला हा सन्मान प्रदान केल्याबद्दल आपण आयोजक आणि सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभारी आहोत, असे अमिताभ म्हणाले.