Tue, Mar 19, 2019 09:16होमपेज › Goa › बाबू कवळेकर यांना अंतरिम जामीन

बाबू कवळेकर यांना अंतरिम जामीन

Published On: Feb 09 2018 1:59AM | Last Updated: Feb 09 2018 1:34AMमडगाव :  प्रतिनिधी

विरोधी पक्ष नेते आमदार बाबू कवळेकर यांनी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक होईल या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर गुरुवारी मडगावच्या सत्र न्यायालयात सुनावणी होऊन येत्या सोमवारपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. पुढील सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे. 

दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी गुरुवारी हा अंतरिम जामीन दिला. एसीबीने 2013 मध्ये कवळेकर यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी केलेल्या तक्रारीनंतर पुन्हा 2017 साली याच प्रकरणी त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी चौकशीसाठी कवळेकर यांनी 1 फेब्रुवारी रोजी एसीबीच्या कार्यालयात हजर राहावे, अशी नोटीस बजावल्यामुळे कवळेकर यांनी वरील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
वकील सुरेंद्र देसाई यांनी बाबू कवळेकर यांच्यावतीने बाजू मांडली.

भाजपला काँग्रेस पक्ष आपले सरकार पाडणार, अशी भीती असल्याने ते आपल्यावर खोटी प्रकरणे दाखल करत आहेत. यासाठीच पोलिसांकडूनही आपली छळवणूक केली जात आहे, असे बाबू कवळेकर यांनी अर्जात म्हटले होते.

बाबू कवळेकर यांनी यापूर्वी सादर केलेल्या अर्जातही बेहिशेबी मालमत्ता प्रकरण किंवा भ्रष्टाचार प्रतिबंधक प्रकरणी होत असलेल्या आरोपांशी  आपला कसलाच संबंध नसल्याचे सांगितले होते. शिवाय आपल्याला विनाकारण या प्रकरणात गोवण्यात येत आहे, असेही म्हटले होते.

 कवळेकरांना एसीबीचे पुन्हा समन्स 
पणजी :  बेहिशेबी  मालमत्ताप्रकरणी विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांना भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी)  पुन्हा एकदा  समन्स बजावले आहे. कवळेकर यांना आज, शुक्रवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी  बोलवण्यात आले आहे. सुमारे 4 कोटी रुपयांच्या या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कवळेकर यांना सोमवार दि. 5 रोजी चौकशीसाठी एसीबीने बोलावले होते. परंतु आगामी अर्थसंकल्पाच्या कामात व्यग्र असल्याने  येऊ शकत नसल्याचे कारण देऊन ते चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. मडगाव न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने एसीबीने त्यांना पुन्हा समन्स बजावले आहे. कवळेकर व त्यांची पत्नी सावित्री  कवळेकर यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सप्टेंबर 2017 मध्ये एफआयआर नोंद करण्यात आला होता.