Fri, Apr 19, 2019 12:42होमपेज › Goa › धार्मिकस्थळांत विशाखा समिती स्थापण्याचे निर्देश

धार्मिकस्थळांत विशाखा समिती स्थापण्याचे निर्देश

Published On: Aug 15 2018 1:22AM | Last Updated: Aug 15 2018 1:22AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील मंदिरे, चर्च आदी धार्मिकस्थळांच्या समितींना अंतर्गत  विशाखा समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत त्यांना त्यांचे म्हणणे 30 सप्टेंबरपर्यंत कळवण्यास सांगितल्याची माहिती   राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अ‍ॅड. शुभलक्ष्मी  नाईक यांनी पणजीत पत्रकार परिषदेत दिली.

कामाच्या ठिकाणी महिलांची होणारी लैंगिक सतावणूक या विषयावर जागृती करण्यासाठी आयोगाकडून शनिवार दि. 18 ऑगस्ट रोजी पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा  सभागृहात सकाळी  9.30 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

अ‍ॅड. नाईक म्हणाल्या, की मंगेशी देवस्थानात तेथील एका पुजार्‍याकडून एका युवतीचा विनयभंग होण्याचे प्रकरण समोर आले  होते. या प्रकरणानंतर आता राज्यातील सर्व धार्मिक स्थळांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्यास त्याची चौकशी करणे शक्य होईल. विशाखा समिती ही कामाच्या ठिकाणी महिलांवर होणार्‍या सतावणुकीच्या चौकशीसाठी असते. या समितींमध्ये महिलांचा समावेश असतो. मात्र, धार्मिक स्थळांच्या समितीवर महिला नसतात.   त्यामुळे या धार्मिक स्थळांच्या घटनांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत  सरकारला आयोग पत्र लिहिणार आहे.

महिला आयोगाकडून आयोजित केल्या जाणार्‍या महिला अत्याचार जागृती कार्यक्रमात  डॉ. केदार फडते,  पोलिस उपधीक्षक   सेराफीन  डायस व  अ‍ॅड. आर्ल्बटीना  आल्मेदा  मार्गदर्शन करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
 राज्य महिला आयोगाच्या  सदस्य नीना नाईक,  समिरा  कार्दोझ व  एसलींडा  डिसोझा उपस्थित होत्या.