Fri, May 24, 2019 06:49होमपेज › Goa › ऊस तोडणीसाठी दिलेल्या आगाऊ रकमेसंबंधी चौकशी करा

ऊस तोडणीसाठी दिलेल्या आगाऊ रकमेसंबंधी चौकशी करा

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 16 2018 12:23AMफोंडा : प्रतिनिधी

राज्यातील विविध भागात अजून अडीच हजार टन ऊस पडून राहिल्याने संजीवनी साखर कारखान्याचा गळीत हंगाम दि.21 मार्चपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून उसाची रक्कम मिळाली नसल्याने राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यात कर्नाटकातील ऊस तोडणीसाठी संजीवनीतर्फे कंत्राटदाराला आगाउ दिलेल्या 5 कोटी 10 लाख रुपयांमुळे राज्यातील शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने आगाऊ दिलेल्या रकमेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. 

फेब्रुवारी महिन्यानंतर कर्नाटकातील ऊस गोव्यात येणे बंद झाला आहे. यावर्षी कर्नाटकातून 1 लाख टन ऊस आणण्यासाठी संजीवनीने ऊस तोडणीसाठी कंत्राटदाराला 5 कोटी 10 लाख रुपये आगाऊ दिले होते. परंतु, सदर कंत्राटदारच गायब झाल्याने संजीवनीसमोर मोठे संकट उभे राहिले होते. फोंड्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोदर मोरजकर यांनी पदाचा ताबा स्वीकारल्यानंतर संजीवनीचा प्रशासक म्हणून सर्वप्रथम कारखाना सुरळीत सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. सध्या कर्नाटकातील 26,499 तर गोव्यातील 43,890 टन उसाचे गळीत करण्यात आले आहे. गेल्यावर्षी गोव्याचा 40 हजार टन तर कर्नाटकातील फक्त 7 हजार टन ऊसाचे गळीत करण्यात आले होते.

संजीवनीतर्फे गोव्यातील शेतकर्‍यांना प्रत्येक 10 दिवसानंतर उसाची रक्कम देण्यात येत होती. मात्र गेले दीड महिने पैसे न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तसेच उसाची वाहतूक करणार्‍या ट्रकना अजून पैसे मिळाले नाहीत. संजीवनीने शेतकर्‍यांना व वाहतूक करणार्‍यांना वेळोवेळी रक्कम देण्याची सोय करण्याची गरज असल्याचे उदय उसापकर यांनी सांगितले. ऊस उत्पादन संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले की, कंत्राटदाराला आगाऊ रक्कम दिल्याचा फटका राज्यातील शेतकर्‍यांना बसलेला आहे. शेतकर्‍यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कंत्राटदाराला आगाऊ दिलेल्या रकमेची सरकारने सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

दीड महिन्यांची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. याची जाणीव असतानासुद्धा सरकारने शेतकर्‍यांना उसाची रक्कम एप्रिल महिन्यात देण्याचे आश्वासन दिले आहे. यावर्षी शेतकर्‍यांना स्वतः कामगार घालून ऊस तोडणी करावी लागली. उसाची तोडणी योग्यवेळी झाली नसल्याने व पाण्याअभावी उसाच्या वजनात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गोव्याच्या उसाचे गळीत अधिक झाले असल्याचे राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

प्रशासक दामोदर मोरजकर यांनी संजीवनीचा ताबा घेतल्यानंतर 65 हजार टन उसाचे गळीत करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार आतापर्यंत 70 हजार टन उसाचे गळीत करण्यात यश मिळविले. येत्या काही दिवसांत आणखीन अडीच हजार टन उसाचे गळीत होण्याची शक्यता आहे.  प्रशासक दामोदर मोरजकर यांनी सांगितले की, शेतकर्‍यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. 20 मार्चपर्यंत ऊस तोडणी करून त्यानंतर 21 मार्चपर्यंत तोडलेला ऊस कारखान्यापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.