Thu, Jan 24, 2019 03:51होमपेज › Goa › पणजीत ‘भाभासुमं’ची निदर्शने

पणजीत ‘भाभासुमं’ची निदर्शने

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 12:24AMपणजी : प्रतिनिधी

राज्य सरकारकडून 38 नव्या मराठी, कोकणी शाळांचे अर्ज फेटाळण्यात आल्याच्या निषेधार्थ सोमवारी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या पणजी विभागातर्फे कदंब बसस्थानक परिसरात निदर्शने करण्यात आली. सरकारने या सर्व शाळांना येत्या शैक्षणिक वर्षात परवानगी न दिल्यास  जनआंदोलन उभारण्यात येईल, असा  इशारा भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या केंद्रीय समितीचे सदस्य महेश म्हांब्रे यांनी  दिला.

म्हांब्रे म्हणाले की, येत्या दोन ते तीन वर्षांत गोव्यातील जवळपास 400 सरकारी शाळा बंद पडण्याच्या वाटेवर आहेत. मात्र, असे असतानाही सरकारने  38 नव्या कोकणी, मराठी शाळांचे अर्ज फेटाळून लावले. यात 24 कोकणी व 14 मराठी शाळांचा समावेश आहे. सरकारने या सर्व शाळांचे अर्ज येत्या शैक्षणिक वर्षात मंजूर करावेत, अशी मागणी त्यांनी  केली.

मातृभाषेला प्रोत्साहन देऊन परकीय भाषेतील शाळांसाठी नव्या अर्जांना मान्यता देणार नाही, असे धोरण असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. परंतु सरकारने तसे न करता मातृभाषेतील शाळांचे अर्ज फेटाळून कदंब पठारावर येणार्‍या ‘गेरा’च्या नव्या इंग्रजी प्राथमिक शाळेचा अर्ज मंजूर केला. सरकारची ही भूमिका दुटप्पीपणाची असून त्याचा तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंचाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. 

Tags : panji, Indian Language Security Forum, goa, goa news