Mon, Aug 19, 2019 11:09होमपेज › Goa › पडोशे, साळ येथे नव्या जलशुद्धी प्रकल्पांना गती 

पडोशे, साळ येथे नव्या जलशुद्धी प्रकल्पांना गती 

Published On: Jul 02 2018 1:43AM | Last Updated: Jul 02 2018 12:47AMडिचोली :प्रतिनिधी 

डिचोली तालुक्यातील पाणीपुरवठ्याशी निगडीत समस्यांवर मात करण्यासाठी पडोशे  येथे स्वतंत्र 10 एमएलडी  जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून जादा पाणी साठवणे तसेच साळ गावासाठी स्वतंत्र प्रकल्प साळ येथील पंपिंग स्टेशन परिसरात उभारण्यात येणार असून त्याला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मान्याता दिली आहे.या प्रकल्पांबाबतचे सोपस्कार सुरु झाले असून एका महिन्यात हे काम हाती घेतले जाणार आहे, आमदार राजेश पाटणेकर यांनी सांगितले 

डिचोली तालुक्यात कच्चे पाणी मुबलक प्रमाणात असूनही जलशुद्धीकरण प्रकल्पातून होणारा पुरवठा वारंवार होणार्‍या खंडित वीज पुरवठ्यामुळे व सातत्याने होणार्‍या यंत्रणेतील बिघाडमुळे  असून अडचण नसून खोळंबा, अशी पाण्याची स्थिती नेहमी अनुभवास येतेे. या प्रकारामुळे डिचोली, मये, साखळी या तिन्ही मतदारसंघातील आमदार त्रस्त आहेत.नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पांना गती मिळाल्याने तालुक्याचे जलसंकट दूर होणार आहे.

पाणीपुरवठा व वीजपुरवठा अनियमित होत असल्याबाबत तालुक्यातील तिन्ही आमदारांना सतत नागरिकांकडून फोनाफोनी होत असते, त्यामुळे खूपच त्रास होत असतो. जनतेला नियमित पाणी मिळावे, ही आमची अपेक्षा आहे याबाबत पाटणेकर यांनी नुकतेच मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या समवेत  जलस्त्रोत खात्याच्या अधिकारीवर्गाची बैठक घेतली तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. यावर आता तातडीने मार्ग काढण्यासाठी सरकारने दखल घेतली असून  दोन्ही ठिकाणी छोटे प्रकल्प मार्गी लावून या भागातील पाणीपुरवठा नियमित करण्याचा सरकारचा प्रयत्न  असल्याचे पाटणेकर यांनी  सांगितले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी साळ  येथील शापोरा नदीचे पाणी बांध घालून अडवून त्याठिकाणी  400 अश्‍वशक्तीचे पाच पंप बसवून सुमारे 23 कोटी खर्चून कच्चे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध  करण्याची महत्त्वपूर्ण योजना साकारली आहे.त्यामुळे आमठाणे धरणात मुबलक प्रमाणात कच्चे पाणी साठवून ते गरजेनुसार शुद्धीकरण प्रकल्पात पाठवण्याची ही योजना भागासाठी वरदान ठरली आहे. मात्र सतत अनियमित वीज पुरवठा व जुनाट झालेली जलशुद्धीकरण प्रकल्पाची मशिनरी यामुळे सतत पाणी पुरवठा विस्कळीत होत असून नागरिक त्रस्त आहेत . नव्या योजनेद्वारे अतिरिक्त पाणी शुद्ध करून स्वतंत्र ठेवले जाणार असून टाकीतून गरज असेल, तसे सोडले जाणार आहे, त्यामुळे जनतेला पाणी मिळणे शक्य होणार असल्याचे पाटणेकर यांनी सांगितले.

आमदार  प्रवीण झांट्ये यांनी मयेतील नागरिकांना वारंवार पाणी समस्या सतावत  असून आपण स्वतःहून सर्वच जलवाहिन्यांची पाहणी केली  होती, जे प्रकल्प आहेत ते जुने असून निकामी होत आहेत. त्यामुळे  नवीन मशिनरी बसवणे व पर्यायी सुविधा होणे गरजेचे आहे, अशी माहिती  आमदार प्रवीण झांटये यांनी दिली.

व्यवस्थेत सुधारणा आवश्यक  ः मुख्यमंत्री  

राज्यात मुबलक प्रमाणात कच्चे पाणी उपलब्ध करण्यासाठी सरकारने अनेक योजना आखलेल्या आहेत.  त्यामुळे पाण्याची कसलीच कमतरता नाही, काही वेळा तांत्रिक बाबींमुळे अडचणी येतात.  त्यावर  मात  करण्यासाठी  आवश्यक  सुधारणा करण्यासाठी ज्या गोष्टी करणे गरजेचे आहे,त्या बाबींची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत. व्यवस्थेत काही सुधारणा करणे गरजेचे असून ती लवकरच केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर यांनी  सांगितले