Sat, Feb 23, 2019 01:58होमपेज › Goa › सलग दुसर्‍या दिवशी शॅक्स मालकांची तारांबळ

सलग दुसर्‍या दिवशी शॅक्स मालकांची तारांबळ

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 12:46AMमडगाव ः प्रतिनिधी

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्र सलग दुसर्‍या दिवशी सोमवारीही खवळलेलाच होता. त्यामुळे सासष्टी तालुक्यातील किनारपट्टी भागात समुद्राच्या पातळीत वाढ होऊन पुन्हा  शॅक व्यावसायिकांची तारांबळ उडाली. मोबोर, वार्का, बाणावली तसेच कोलवा  किनार्‍यावर भरती रेषेपासून दहा ते पंधरा मीटर अंतरावर समुद्राचे पाणी पोहोचले होते. त्यामुळे शॅक मालकांनी स्वतः शॅक्स रिकामे केले.

शॅक हंगाम संपत आलेला असल्याने शॅक मालकांनी आपापले शॅक काढण्याचे काम हाती घेतलेले असताना रविवारी अचानक समुद्राच्या पातळीत वाढ होऊन  मोठमोठ्या लाटा किनार्‍यावर येऊन आदळत होत्या. सोमवारी पुन्हा पाण्याची पातळी वाढली. मोबोर येथील शॅक मालकांनी आपले शॅक काढण्याचे काम हाती घेतले होते. केवळ कोलेनॉल फर्नांडिस यांचे शॅक हटवण्यात आले नव्हते.पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने त्यांच्या शॅकमध्ये पाणी शिरले. काही शॅक्ससमोर पर्यटकांसाठी घालण्यात आलेल्या बेड्स पाण्यात वाहून गेल्या. कोलवात समुद्र किनार्‍याची बरीच धूप झाली. बाणावलीतील शॅक मालकांनी शॅक हटवले होते. त्यामुळे जादा नुकसान झाले नाही. झालोर समुद्र किनार्‍याजवळ मच्छिमारांची जाळी आणि बोटी नांगरून ठेवण्यात आलेल्या आहेत. पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी बोटीपर्यंत आले होते. वास्कोतसुद्धा अशीच स्थिती निर्माण झाली होती.

कोलवात जीवरक्षकांनी पर्यटकांना पाण्यात न उतरण्याच्या सूचना दिल्या. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पाण्याची पातळी वाढली होती. मोबोर येथे रात्री 8 वाजता समुद्राच्या लाटा सुमारे पंधरा मीटर उंचीपर्यंत उसळत होत्या.

Tags : goa, sea, arebic sea, costal area