Sat, Jul 20, 2019 11:21होमपेज › Goa › अल्पवयीनांच्या शोषणात पाच वर्षांत वाढ

अल्पवयीनांच्या शोषणात पाच वर्षांत वाढ

Published On: May 18 2018 1:38AM | Last Updated: May 18 2018 1:27AMपणजी : मनाली प्रभूगावकर

देशातील अठरा वर्षांखालील  मुलांना कोणत्याही प्रकारच्या समस्या किंवा त्रास असल्यास देशभर विनाशुल्क 24 तास सुरू असलेला सरकारी हेल्पलाईन नंबर 1098 हा वरदान ठरत आहे. परंतु, याच हेल्पलाईन नंबरवरून हाताळण्यात आलेल्या कित्येक प्रकरणांमधून  लहान मुलांचे होत असलेले शोषण व त्यांच्या समस्या गेल्या पाच वर्षात वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. चिमुकल्या तार्‍यांचा काही विकृत मानसिकता असलेल्या लोकांपासून बचाव करण्यासाठी सतर्कता गरजेची आहे, अशी माहिती करितास गोवा या संस्थेतील चाईल्डलाईनच्या समन्वयक सुझेन डिसोझा यांनी दिली.

सुझेन डिसोझा म्हणाल्या, संस्थेला पूर्वी  वर्षाकाठी तीनशे ते साडेतीनशे फोन येत होते. गेल्या एका वर्षात यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पाचशेहून अधिक फोन संस्थेव्दारे हाताळण्यात आले आहेत. गोव्यात करितास या संस्थेतर्फे गेली सात वर्षे 1098 हा  हेल्पलाईन नंबर हाताळला जात आहे. या नंबरवर कित्येक मुलांचा, पालकांचा त्याचप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांचा समस्यां सांगणारा फोन येतो. संस्थेकडून मुलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. 

चाईल्ड लाईनवर बालमजूर, मुलांचे लैंगिक व मानसिक शोषण, शिक्षण, मूल हरविल्याबद्दल, घरातून पळून गेल्यासंदर्भात, आरोग्य विषयक समस्यांबद्दलचे फोन संस्थेला येतात. प्रथम हे फोन मुंबई येथील मुख्य विभागाला लागतात व त्यांच्याकडून गोव्यात हे कॉल्स कॉन्फरंस केले जातात किंवा फोन केलेल्या व्यक्तीची माहिती पाठविली जाते. त्यानंतर करितासकडून सदर व्यक्तीला फोन करून समस्यांबद्दल जाणून घेऊन लगेचच आवश्यक मदत किंवा कारवाईसाठी पावले उचलली जाजात, असे डिसोझा यांनी सांगितले. 

करितास गोवा मधील चाईल्डलाईन क्रमांक विभागात सहा सदस्य व एक समुपदेशक आहे. मुलांना  बालहक्क कायदा व त्यांच्या अधिकारांबद्दल माहिती असावी यासाठी बालदिन, बालमजूर विरोधी दिनानिमित्त संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मुलांना समाजात घडत असलेल्या काही संवेदनशील विषयांवर देखील माहिती असावी यासाठी व्याख्यान, पथनाट्य या माध्यमातून वेळोवेळी मुलांना माहिती दिली जाते. यासाटी संस्थेचे सदस्य कधी विद्यालयांमध्ये तर कित्येकदा गरीब वस्तीला भेट देऊन तेथील पालक तसेच मुलांमध्ये याविषयी माहिती दिली जाते.  

चाईल्डलाईनचा हा उपक्रम सर्वात प्रथम मुंबईतील टाटा संस्थेतर्फे 1996 मध्ये सुरू करण्यात  आली होती. त्यानंतर सरकारने 2000 साली मुलांच्या संरक्षणाचा विचार लक्षात घेऊन देशभरासाठी याचा कारभार स्वत: हाती घेतला. त्यानंतर 2009 सालापासून हा क्रमांक महिला व बाल कल्याण मंत्रालयाकडून हाताळला जात आहे. 2011 पासून गोव्यात करितास गोवा संस्था हे काम पहात आहे. त्यापूर्वी गोव्यात डॉन बॉस्को संस्थेतर्फे हे फ ोन पाहिले जात होते, असेही डिसोझा यांनी सांगितले.