Wed, Apr 24, 2019 07:43होमपेज › Goa › पंचायत घरांसाठीच्या निधीत वाढ

पंचायत घरांसाठीच्या निधीत वाढ

Published On: Aug 02 2018 1:57AM | Last Updated: Aug 02 2018 1:49AMपणजी ः प्रतिनिधी

पंचायत घरांच्या नूतनीकरणासाठी व नवे पंचायत घर उभारण्यासाठी   दीनदयाळ पंचायतराज पायाभूत सुविधा विकास योजना 2013 (सुवर्ण जयंती)   अंतर्गत दिल्या जाणार्‍या 2 कोटी रुपयांच्या निधीत वाढ करुन ते  3. 5 कोटी रुपये करण्याबाबतचा प्रस्ताव सरकार विचाराधीन असल्याची माहिती पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवेळी दिली.

राज्यातील पंचायत घरांच्या दुरावस्थेबाबत व तेथे असलेल्या पायाभूत सुविधांच्या अभावाबाबत हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवेळी उत्तर देताना सदर माहिती देण्यात आली. 

मंत्री गुदिन्हो म्हणाले, की राज्यात 191 पंचायती आहेत. त्यापैकी 179 पंचायतींकडे स्वत:चे पंचायत घर आहे. 134 पंचायत घरांची स्थिती चांगली आहे. 56 पंचायत घरांची दुरुस्ती आवश्यक असून त्यापैकी 43 पंचायत घरांच्या दुरुस्तीसंदर्भात प्रस्ताव सरकारकडे आले आहेत. जीटीडीसी व जीएसआयडीसी अंतर्गत दीनदयाळ  पंचायत राज पायाभूत सुविधा विकास योजना 2013 (सुवर्ण जयंती)   अंतर्गत दिल्या जाणार्‍या 2 कोटी रुपयांचा निधी दुरुस्ती व नवे पंचयात घर बांधण्यासाठी दिला जात आहे.

मात्र, या निधीत वाढ करुन तो 3.5 कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. याशिवाय राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान  अंतर्गत  नवी  चार पंचायत घरे उभारण्यात येणार आहेत. परंतु  या संदर्भात  संबंधित चार पंचायतींकडून अजूनही प्रस्ताव आले नसल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.