Thu, Jun 27, 2019 00:03होमपेज › Goa › शेतकर्‍यांसाठी प्रोत्साहन योजना

शेतकर्‍यांसाठी प्रोत्साहन योजना

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 28 2018 11:45PMपणजी : प्रतिनिधी

गोव्यात पिकवल्या जाणार्‍या भाजीला विदेशात बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी खाते लवकरच  ‘निर्यातयोग्य भाजी पिकवण्याकरीता शेतकर्‍यांना प्रोत्साहन’ योजना  कार्यान्वित करणार आहे, अशी घोषणा कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित   कार्यक्रमात  केली.

शेतमजूर शेतांमध्ये काम करण्यासाठी मजुरी म्हणून फार पैसे घेतात. अनेकदा ही मजुरी शेतकर्‍यांना परवडत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना सहाय्यभूत होईल, अशा तर्‍हेने शेतमजुरांना ‘मनरेगा’ अंतर्गत जॉब कार्ड दिली जातील. त्यामुळे त्यांच्या मजुरीचा ठराविक दरही निश्‍चित  होईल. या कामगारांना ‘मनरेगा’चे लाभही मिळतील, असेही त्यांनी  सांगितले.

धेंपे  कला व  विज्ञान महाविद्यालय, गोवा कृषी खाते व गोवा फलोत्पादन महामंडळाच्या संयुक्‍त विद्यमाने  ‘गोमंतकीय शेतकर्‍यांनी पिकवलेल्या भाजीच्या निर्यातीचे भवितव्य’ या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

मंत्री सरदेसाई म्हणाले,  गोव्याची भाजी तसेच फळांना  विदेशात मागणी आहे. त्यामुळे निर्यातक्षम भाज्या व फळांचे उत्पादन करण्यासाठी सरकार  राज्यातील शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच तत्पर असते. भेंडी, हिरवी मिरची या भाज्यांची युरोपात गोव्यातून निर्यात केली जाते.  गोव्याच्या शेतकर्‍यांना भाजी तसेच फळांच्या निर्यातीतून चांगली बाजारपेठ मिळावी या उद्देशाने निर्यातयोग्य भाजी पिकवण्याकरीता शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याविषयीची योजना राबवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य चांगले रहावे यासाठी चांगले तसेच दर्जेदार अन्‍न उत्पादित  करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्राकडे वळणे गरजेचे आहे,  मात्र अनेक तरुण कृषी क्षेत्राकडे वळण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येते. शेतीतूनदेखील चांगले उत्पन्न मिळते. गोव्यात सुमारे 13 हजार हेक्टर  पडीक शेतजमीन आहे. या जमिनीत शेती करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन  देणे गरजचे असल्याचे मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.

राज्य फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झांटये, कृषी संचालक नेल्सन फिगेरेदो, फलोत्पादन महामंडळाचे कार्यकारी व्यवस्थापक माधव केळकर, धेंपे चॅरिटेबल ट्रस्टच्या पल्‍लवी धेंपे, धेंपे कला व  विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य वृंदा बोरकर व्यासपीठावर होते. शेतकरी संदीप गीते, अनिल पाटील, सुबोध  माधवी, रोहीत  दांडेकर,  इंदुलकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.