Thu, Jun 20, 2019 01:03होमपेज › Goa › पर्रा गावाने खूप काही दिले,परतफेड करणार

पर्रा गावाने खूप काही दिले,परतफेड करणार

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 05 2017 1:48AM

बुकमार्क करा

म्हापसा : प्रतिनिधी

पर्रा गावाशी आपले घनिष्ट संबंध आहेत.या गावाने आपल्याला खूप काही दिले आहे. त्याची परतफेड  करायची असून गावासाठी काहीतरी द्यावे, अशी आपली इच्छा आहे.  पर्रा देवस्थानच्या विकासासाठी सर्व ते सहकार्य मिळेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले. 

पर्रा येथील श्री वरद सिद्धिविनायक वातानुकूलित सभागृहाचे उद्घाटन केल्यावर मुख्यमंत्री पर्रीकर बोलत होते. व्यासपीठावर उपसभापती मायकल लोबो, पर्रा सरपंच डिलायला लोबो, म्हापसा  नगरसेवक सुधीर कांदोळकर, वास्तुशिल्पकार प्रशांत गावकर,  कंत्राटदार ज्ञानेश्‍वर वायंगणकर, पर्रा देवस्थान अध्यक्ष दत्ताराम पेडणेकर व देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

नाताळानंतर  गावच्या पंचायत घरासाठी लक्ष घातले जाईल.  मायकल लोबो यांनी गावासाठी खूप काही केले आहे, त्यांचे उपकार पर्रावासीयांनी विसरू नयेत. राज्याचा झटपट विकास होत आहे. आपल्या बालपणीचा पर्रा  आणि आजचा पर्रा यात मोठा फरक  झाला आहे. आमदार   लोबोंनी   गावात विकासाची गंगा आणली असून गाव बदलत चालला आहे,  माणसांनी मात्र बदलू नये, माणुसकी कायम ठेवावी. माणुसकीचा ओलावा कायम रहावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मायकल लोबो म्हणाले, की वरदसिद्धी विनायक  ट्रस्टने नव्याने झालेल्या या वातानुकुलित सभागृहाची योग्य देखभाल करावी. तसेच भागातील किमान 10 गरजू मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सुरू करावी. ट्रस्टने केलेल्या कार्याची स्तुती करून भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दामोदर पेडणेकर म्हणाले, की   या सभागृहामुळे सामाजिक व सांस्कृतिक कार्याला चालना मिळणार आहे. आज देवस्थानचे संकेतस्थळ करण्यात आले असून सभागृहासाठी   नोंदणी केली जात आहे.  आगावू 11 लग्न समारंभासाठी सभागृहाची नोंदणी  झाली आहे. दत्ताराम पेडणेकर यांनी स्वागत केले. प्रा. प्रदीप मोरजकर यांनी सूत्रसंचालन केले.  विश्‍वनाथ पेडणेकर यांनी  आभार मानले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.