Fri, May 24, 2019 08:26होमपेज › Goa › आयुर्वेद हजारो वर्षे जुनी श्रेष्ठ उपचारपद्धती : श्रीपाद नाईक 

आयुर्वेद हजारो वर्षे जुनी श्रेष्ठ उपचारपद्धती : श्रीपाद नाईक 

Published On: Jun 25 2018 1:46AM | Last Updated: Jun 24 2018 11:43PMम्हापसा : प्रतिनिधी

आयुर्वेद म्हणजे आपली पारंपरिक, हजारो वर्ष जुनी आरोग्य, उपचार पद्धती आहे. परकीय आक्रमण तसेच पारतंत्र्यात हे ज्ञान दाबले गेले. शिवाय भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहताना स्वतःची उत्पादने लादण्यासाठी दिशाभूल केली गेली, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी केले.  

म्हापसा येथील दयानंद बांदोडकर क्रीडा संकुलामध्ये  रविवारी आयुर्वेदिक न्यूरो थेरेपी आरोग्य शिबिराचे उद्घाटन आयुषमंत्री नाईक यांच्या हस्ते झाले. मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, गोवा, मेधा पर्रीकर रुग्ण सेवा केंद्र, म्हापसा, केंद्रीय योग व निसर्गोपचार संशोधन संस्था, आयुष मंत्रालय, आयुष विभाग, गोवा सरकार, क्रीडा विभाग, गोवा, युथ हॉस्टेल यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

दि.24  ते  30 जून या सात दिवसांच्या कालावधीत नागरिकांना येथे मोफत उपचार मिळणार आहेत. आखडलेले खांदे, पाठदुखी, मणक्याचा त्रास अशा सतत डोके वर काढणार्‍या त्रासावर या शिबिरात उपचार केले जाणार आहेत. हे उपचार देण्यासाठी देशभरातून  डॉक्टर स्वखर्चाने गोव्यात दाखल झाले असून या सेवेसाठी ते कोणतेही मानधन घेणार नाहीत. 

राज्यात होणारे हे दुसरे शिबिर असून पहिल्या शिबिराला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद व नागरिकांनी केलेली मागणी पाहता, पुन्हा एकदा या आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याचे असल्याचे आयोजकांनी सांगितले.  नाईक म्हणाले, आधुनिक उपचार पद्धती खर्चिक असून बेभरवशाची देखील आहे. आयुर्वेद आजारी पडू नये म्हणून काळजी घेते. परत एकदा आपल्या मूळच्या भारतीय जीवनशैलीकडे आपण वळायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले. 

जनतेने व गोवा सरकारने केलेल्या सर्व सहकार्याबद्दल आभार व्यक्त करून लवकरच आपण दक्षिण गोव्यातही अशा शिबिराचे आयोजन करणार आहोत, अशी माहिती श्रीपाद नाईक यांनी दिली.  उद्घाटन कार्यक्रमात  पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर तसेच प्रमुख आयोजक डॉ. मनोज शर्मा व इतर काही मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे डॉ. मनोज शर्मा यांनी लिहिलेल्या ‘आयुर्वेद’ अनुभूत योग्य संग्रह या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.