Wed, Mar 20, 2019 22:53होमपेज › Goa › राज्य चित्रपट महोत्सवाचा आज ‘के सेरा सेरा’ने प्रारंभ

राज्य चित्रपट महोत्सवाचा आज ‘के सेरा सेरा’ने प्रारंभ

Published On: May 03 2018 1:28AM | Last Updated: May 03 2018 1:16AMपणजी : प्रतिनिधी

गोवा मनोरंजन संस्थेतर्फे आयोजित 9 व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि.3) आयनॉक्स 1 मध्ये संध्याकाळी 5 वाजता ‘के सेरा सेरा’ या चित्रपटाने होईल.  यंदाचा जीवनगौरव पुरस्कार गोमंतकीय सिनेमेटोग्राफर सूर्यकांत लवंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुरस्कार वितरण व समारोप  सोहळा 6 मे रोजी होणार असून अनेक सिनेतारकांची  यावेळी उपस्थिती लाभणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

तालक म्हणाले, महोत्सवाचे उद्घाटन  वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, खासदार नरेंद्र सावईकर यांच्यासह चित्रपट  निर्मात्यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर ‘के सेरा सेरा’ हा   चित्रपट दाखविला जाईल. चार दिवशीय महोत्सवात एकूण  बारा मराठी व कोकणी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असून यातील दहा ‘फिचर’ तर दोन ‘नॉन फिचर’ चित्रपट आहेत. यातील फिचर चित्रपट मॅकनिझ पॅलेस 1 मध्ये तर नॉन फिचर चित्रपट मॅकनिझ 2 मध्ये प्रदर्शित केले जातील.  

पुरस्कार वितरण सोहळ्यात  ‘रुस्तम’ व ‘टाइम प्लीज’ यासारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी पार्श्‍वगायन केलेल्या यशराज जोशी यांचा सांगितीक कार्यक्रम होईल. नामवंत गायिका सोनिया शिरसाट यांचे गायन व विनोदी कलाकार ऑरटेंयिओ परेरा व इम्रान शेख यांचा विनोदी  कार्यक्रम पाहण्याची संधी सिनेरसिकांना लाभणार आहे. त्याचबरोबर मुंबईच्या सिध्दाई कला पथकाचा नृत्याचा कार्यक्रम तसेच गोमंतकीय कलावंत अमित व साक्षी यांचे नृत्य सादरीकरण होईल. 

महोत्सवात 3 ते 6 मे दरम्यान आयनॉक्स परिसरात फुड कोर्ट तसेच अन्य मनोरंजनपर  कार्यक्रम होणार आहेत. संस्थेच्या कला दालनात गोवा  कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कलाप्रदर्शनही भरणार असल्याचे तालक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस सचिन चाटे, मृणाल वाळके व संदीप कुंडईकर उपस्थित होते.