Sat, Jul 20, 2019 10:40होमपेज › Goa › कब्रस्तान नूतनीकरणाच्या नावाखाली उद्यान उभारणीचा घाट

कब्रस्तान नूतनीकरणाच्या नावाखाली उद्यान उभारणीचा घाट

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 05 2018 1:28AMपणजी : प्रतिनिधी

सांतीनेज येथील कब्रस्तान नूतनीकरणाच्या नावाखाली  तेथे उद्यान बांधण्याचा घाट पणजी महानगरपालिकेने घातला आहे, असा आरोप पणजीचे नागरिक  सय्यद मन्झुर काद्री यांनी केला असून मनपाने सादर केलेल्या आराखड्याला  दिलेली परवानगी  रद्द करून  या आराखड्यात  दुरुस्ती करावी,  अशी मागणी त्यांनी उत्तर  गोवा पीडीएकडे पत्राद्वारे केली आहे.  या मागणीकडे दुर्लक्ष  झाल्यास  उच्च न्यायालयात जाण्याचा  इशाराही त्यांनी दिला आहे.

काद्री यांनी दिलेल्या माहितीनुसार,27 मे 1983 रोजी या 3 हजार 200 चौरस मीटर्स जागेत जामा मस्जिद व कब्रस्तानचे पणजी महानगरपालिकेने  एकत्रितपणे विस्तारीकरण तसेच त्याचे बांधकाम केले होते. त्यानंतर 26 डिसेंबर 2016 रोजी उत्तर  गोवा पीडीएने   नगरनियोजन कायदा 1974 च्या कलम 44 अंतर्गत   या कब्रस्तानच्या नूतनीकरणासाठी पणजी मनपाला परवानगी दिली होती.

मनपाकडून कब्रस्तान नूतनीकरणासंदर्भात सादर करण्यात आलेल्या आराखड्यात  838.47 चौरस मीटर्स जागेत  उद्यान दाखवण्यात आले आहे.  कब्रस्तान हे मृतांना दफन करण्यासाठी असून या जागेत उद्यान बांधण्याचा घाट कब्रस्तान नूतनीकरणाच्या नावाखाली घालण्यात आल्याचे  काद्री यांनी सांगितले.  

मनपाकडून  सादर करण्यात आलेल्या या आराखड्याला कुठल्या कायद्याने परवानगी देण्यात आली आहे. कब्रस्तानची जमीन उद्यान बांधण्यासाठी वापरण्यासंबंधी आराखड्यात कसा बदल करण्यात आला. नूतनीकरण ठीक आहे, पण त्यात उद्यान उभारणे अयोग्य असल्याचे  पत्र उत्तर गोवा पीडीएला  पाठवल्याचे  काद्री  म्हणाले. कब्रस्तानात उद्यान उभारणे, हे कदाचित देशातील पहिलेच उदाहरण असावे, हे चुकीचे असून कब्रस्तानात उद्यान उभारण्याला देण्यात आलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणी पीडीएकडे करण्यात आल्याचे काद्री यांनी सांगितले.