होमपेज › Goa › प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात सरकारी नोकराच्या गैरहजेरीची चौकशी करा

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात सरकारी नोकराच्या गैरहजेरीची चौकशी करा

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 12:15AMडिचोली : प्रतिनिधी

सरकारी नोकरांनी आपली कार्यक्षमता 100 टक्के दाखवून देण्याची गरज असून प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात त्यांनी 100 टक्के उपस्थिती असणे गरजेचे आहे.   मोठ्या संख्येने सरकारी नोकर प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास आले नाहीत याबद्दल सभापतींनी  नाराजी व्यक्त केली. गैरहजर असलेल्या सर्व सरकारी कामगारांकडून स्पष्टीकरण घ्यावे,  असा आदेश उपजिल्हाधिकार्‍यांना सभापतीं  डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.भारतीय प्रजासत्ताक दिनी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सभापती प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.

सर्वधर्म समभाव मानून  गुण्यागोविंदाने नांदणार्‍या या गोव्यात नको ते विषय काढून त्याचे राजकीय भांडवल करणारे काही विरोधक   शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. नको ते राजकारण करुन राज्यातील शांतता बिघडवण्याचा कुणीच प्रयत्न करु नये, असे  आवाहन   सभापती  सावंत यांनी केले.

सभापती  म्हणाले, की गोवा प्रगतीच्या दिशेने  वाटचाल करीत असताना गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई  नदीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न उपस्थित झालेला असून तिचे रक्षण करण्यासाठी संघटितपणे सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. अनेक बाबतीत विरोधासाठी विरोध करण्याची प्रवृत्ती धोकादायक आहे.  डिचोली पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी सभापतींना मानवंदना दिली. सभापतींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपजिल्हाधिकारी प्रदिप नाईक यांनी स्वागत केले. मामलेदार मधू नार्वेकर, संयुक्त मामलेदार मंदार नाईक, प्रवीजंय पंडित, ज्येष्ठ नागरिक देऊ पळ, आदी उपस्थित होते.  महादेव परब यांनी कविता व तुळशीदास मांद्रेकर यांनी  देशभक्ती गीत सादर केले.