Mon, May 20, 2019 18:52होमपेज › Goa › मडगाव पालिकेत सर्व्हरबरोबरच ‘सेवा’ही डाऊन

मडगाव पालिकेत सर्व्हरबरोबरच ‘सेवा’ही डाऊन

Published On: Apr 12 2018 1:21AM | Last Updated: Apr 12 2018 12:25AMमडगाव : प्रतिनिधी

मडगाव नगरपालिकेत ऑनलाईन सुविधा पुरविणारा सर्व्हर अचानक बंद पडल्याने पालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.सिस्टीम क्रॅश झाल्याने दाखले आणि परवाने देण्याची प्रक्रिया बंद पडली आहे. परिणामी बुधवारी विविध दाखल्यांसाठी पालिकेत आलेल्या लोकांची मोठी गैरसोय झाली होती. शैक्षणिक   वर्ष जूनपासून सुरु होत असल्याने प्रवेश प्रक्रियेसाठी जन्म दाखले मिळविण्यासाठी  सकाळपासून पालिकेत रांगा लावलेल्या पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल  होत असल्याचे दिसून आले. पालिकेचा सर्व्हर मंगळवार, दि.10 एप्रिलपासून बंद असून बुधवारी सकाळी दोन मिनिटांकरिता सर्व्हर  सुरू झाला होता. पण लगेच पुन्हा बंद पडल्याने  बुधवारी लोकांना बराच मनस्ताप सोसावा लागला.

सासष्टी तालुक्यातील जनतेचे जन्म आणि मृत्यू दाखले मडगाव नगरपालिकेत उपलब्ध आहेत. पण या सुविधा इंटरनेटशी जोडल्या गेल्याने सर्व्हर  चालल्यावरच लोकांना वरील दाखले मिळू शकतात.दरदिवशी पालिकेतून जन्म आणि मृत्यूचे सुमारे एक हजार दाखले जारी केले जातात. लोकांना सर्व्हर  बंद असल्याची माहिती देण्यात न आल्याने सकाळपासून मोठ्या संख्येने लोकांनी पालिकेत गर्दी केली होती, दुपारपर्यंत सर्व्हर  सुरळीत न झाल्यामुळे लोकांना  रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.
 मुख्याधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांनी ‘पुढारी’शी बोलताना  सांगितले, की सर्व्हर डाऊन असल्याने पालिकेतील सर्व व्यवहार खोळंबले आहेत. लोकांना  विविध प्रकारचे दाखले, परवाने आदी सुविधा देण्यात अडचणी येत आहेत.  इंटरनेट सुविधा मंगळवारपासून बंद पडलेली आहे. लोकांचे हाल होत आहेत आणि पालिकेतील सर्व विभागांच्या कामावर परिणाम झाल्याचेही त्यांनी सांगितले.

  पालिकेत सर्व्हरची सुविधा पुरवण्याचे आणि देखरेख करण्याचे काम ‘एनआयसी’च्या पर्वरी स्थित कार्यालयाकडे सोपविले आहे.पालिकेच्या काही अधिकार्‍यांशी चर्चा केली असता,पालिकेत सर्व्हरची खास खोली असून त्याठिकाणी यूपीएस बॅटरी ठेवण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी या खोलीला आग लागून सर्व साहित्य जळाले होते. यूपीएस बॅटरी व्यवस्थित चालण्यासाठी चोवीस तास वातानुकूलन यंत्रणा  सुरू राहणे आवश्यक आहे,   मात्र पालिकेच्या सर्व्हर रूममध्ये केवळ दीड टन क्षमता असलेला एकच एसी बसविण्यात आल्याने यूपीएस गरम होऊन बंद पडत आहे. सध्या जन्म आणि मृत्यू  घरपट्टी, व्यवसाय परवाना, उत्पन्न, आवक नोंदी, हेल्प डेस्क आदी दाखले देणार्‍या एक खिडकी योजना बंद पडलेल्या आहेत.
     

जन्म दाखल्यासाठी पालिकेत तिसर्‍यांदा आलेल्या फ्रान्सिस मोराईस ‘पुढारी’शी बोलताना म्हणाले, की लोक दूरवरून पालिकेत येत आहेत. पालिकेने सर्व्हर डाऊन असल्याचा बोर्ड बाहेर लावला असता तर लोकांवर तासंतास  रांगेत उभे राहण्याची वेळ आली नसती.पालिकेने लोकांवर हेलपाटे मारण्याची वेळ आणली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे फार हाल झाल्याचेही ते म्हणाले. मुख्याधिकारी जॉन्सन फेर्नांडिस म्हणाले, की  सध्या सर्व्हर डाऊन असल्याने पालिकेची सर्व कामे खोळंबली आहेत. याविषयी ‘एनआयसी’या संगणक सेवा पुरवणार्‍या  कंपनीला माहिती देण्यात आली आहे.
Tags :In Madgaon, municipality, server  left,service,goa news