होमपेज › Goa › वास्को मच्छीमारी जेटीसंदर्भात २० रोजी संयुक्‍त बैठक बोलवा 

वास्को मच्छीमारी जेटीसंदर्भात २० रोजी संयुक्‍त बैठक बोलवा 

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 14 2017 12:21AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी
वास्कोत उभारण्यात येत असलेल्या मच्छीमारी जेटीसंदर्भात  निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी  20  डिसेंबर रोजी  एमपीटी, स्थानिक आमदार तसेच संबंधितांची संयुक्‍त बैठक बोलावण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर यांनी मत्स्योद्योग मंत्री  विनोद पालयेकर यांना केली. विधानसभेत  बुधवारी प्रश्‍नोत्तर तासावेळी ते बोलत होते.

सदर जेटी एमपीटीकडून उभारण्यात येत असली तरी  त्या जेटीचे संपूर्ण अधिकार हे सरकारकडेच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी मच्छीमार जेटीसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना  पर्रीकर  यांनी वरील सूचना केली.

 आमदार आल्मेदा म्हणाले, एमपीटीकडून उभारण्यात येणार्‍या या जेटीवर कशा प्रकारच्या  सुविधा असतील, स्थानिक मच्छीमारांसाठी तरतूद तसेच सदर एमपीटीकडून जेटी उभारली जात असल्याने त्यावर सरकारचा अधिकार असेल का, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर मत्स्योद्योग मंत्री पालयेकर यांनी   सांगितले की,  या जेटीच्या बांधकामासाठी  लागणार्‍या एकूण खचार्ंपैकी  50 टक्के  खर्च  केंद्र सरकार, 25 टक्के  एमपीटी तर 25  टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे. या प्रकल्पासाठी  राज्य सरकारकडून  26 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  याप्रश्‍नी जर कुणाला काही शंका किंवा प्रश्‍न असतील तर त्यावर चर्चा करण्यासाठी   स्थानिक आमदार, एमपीटी, होडीधारक व संबंधितांची संयुक्‍त बैठक बोलावली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, किनारी क्षेत्र व्यवस्थापनाचा आराखडा  तयार होईपर्यंत  सीआरझेड अंतर्गत परवानगी  न  देण्याचा आदेश  राष्ट्रीय हरीत लवादाने दिला आहे. लवादाच्या या आदेशात  सवलत मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी  सरकार कायदेशीर सल्‍ला घेणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  यांनी सभागृहात सांगितले.

चोडण-रायबंदर जलमार्गावर  फेरीबोटी  वाढवा : प्रवीण झांट्ये

पणजी : प्रतिनिधी

चोडण-रायबंदर  जलमार्गावरील फेरीबोटींची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी  विधानसभेत  बुधवारी शून्य तासावेळी केली.  नदी परिवहन  मंत्री सुदिन ढवळीकर यांनी यावेळी   सदर मार्गावर फेरीबोटींची  संख्या वाढविण्याचे आश्‍वासन दिले.

 झांट्ये  म्हणाले, चोडण रायबंदर जलमार्गावर केवळ चारच  फेरीबोटी असून प्रवाशांची संख्या वाढल्याने त्या सध्या अपुर्‍या पडत आहेत. या मार्गावर सकाळी, दुपारी तसेच संध्याकाळच्या  बरीच गर्दी होत असल्याने फेरीबोटी कमी पडत आहेत. या मार्गावर किमान 7 फेरीबोटींची आवश्यकता असून  फेरीबोटींच्या संख्येत वाढ करावी. 

मंत्री ढवळीकर  यांनी सांगितले, की  नदी परिवहन खात्याच्या ताफ्यात  लवकरच नव्या फेरीबोटी  दाखल होणार आहेत. फेरीबोटींची कमतरता ही  केवळ चोडण -रायबंदर या जलमार्गावरील समस्या नसून अन्य मार्गांवर देखील हीच  अडचण  आहे. त्यावर उपाय  शोधला जात असल्याचे  त्यांनी सांगितले.

विधानसभेत दिवंंगतांना श्रद्धांजली

पणजी : प्रतिनिधी

विधानसभेत बुधवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव  मांडून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

ज्येष्ठ  अभिनेते शशी कपूर, माजी खासदार अ‍ॅड. अमृत कासार, माजी आमदार दुलो कुट्टीकर, साहित्यिक अरुण साधू, कोकणी कवी युसूफ शेख, हिंदूस्थानी शास्त्रीय गायिका गिरीजा देवी, हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर, माजी केंद्रीय मंत्री तथा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे माजी अध्यक्ष प्रिय रंजन दासमुंशी, नाट्यकलाकार व गायक पं. नारायणराव बोडास, उद्योजक जयसिंह मगनलाल, मूळ गोमंतकीय असलेले माजी मुख्य सचिव  डॉ. जे. सी. आल्मेदा यांना विधानसभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक  जगन्नाथ पेडणेकर,  ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक  बळवंतराव देसाई, साहित्यिक  एच. एम. मराठे,  पत्रकार वासू नाईक, भारतीय वायू सेनेचे माजी मार्शल अरजान सिंग, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गणपत पुनाळकर, साहित्यिक रघुनाथ जोगळेकर, मराठी नाट्य दिग्दर्शक महाबळेश्‍वर रेडकर व शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्रीधर फडके यांनाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, विरोधी पक्षनेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर, मंत्री पांडुरंग मडकईकर, आमदार प्रसाद गावकर व विधानसभेच्या  अन्य सदस्यांनी श्रध्दांजली वाहिली.

विद्यार्थ्यांनी वर्गावर बहिष्कार घालणे अयोग्य 

पणजी : प्रतिनिधी

प्राचार्य व शिक्षकांच्या बदली विरोधात विद्यार्थ्यांकडून वर्गावर बहिष्कार घालण्याचे प्रकार अयोग्य आहेत. सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्स यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासावेळी केली.  

 प्राचार्य किंवा शिक्षकांच्या बदलीचा विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून वर्गावर बहिष्कार  घालण्याचे प्रकास समोर येत आहेत. शाळा हे शिक्षणाचे मंदिर असून तेथे अशा प्रकारच्या घटना घडणे अयोग्य आहेत. रस्त्यावर उतरून वर्गावर बहिष्कार घालणे, हे प्रकार देशाच्या अन्य राज्यांत दिसतात. गोव्यात असे प्रकार घडत नव्हते. मात्र, असे प्रकार आता घडू लागले आहेत. ही चिंतेची बाब आहे.  राज्य सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नेरी रॉड्रिग्स यांनी केली.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले, शाळा ही  शिक्षण घेण्यासाठी असते राजकारणासाठी नाही. जर काही समस्या असेल तर विद्यार्थ्यांनी शिक्षण खात्याशी संपर्क साधून तोडगा निघण्याची वाट पहावी. अशाप्रकारे  त्वरित  प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शाळेची शिस्त महत्त्वाची असून  याबाबत सरकार नेहमीच कठोर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.