मडगाव : प्रतिनिधी
इस्पितळात आणि क्लिनिकमध्ये निर्माण होणारा वैद्यकीय कचरा सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी बनू लागला आहे. कुडचडे मतदारसंघातील प्रभाग एकमधील निर्जन जागा वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावण्याचे केंद्र बनू लागले आहे. उघड्यावर फेकल्या जाणार्या सिरिन्ज आणि औषधांच्या बाटल्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. संबंधितांकडून कारवाई करण्याची मागणी लोकांतून होत आहे.
कुडचडे पालिका क्षेत्राच्या प्रभाग एकमध्ये दाभामळ या गावी जाण्याच्या वाटेवर लागणार्या डोंगर माथ्यावर रस्त्याशेजारीच शेकडोच्या संख्येने औषधांच्या रिकाम्या बाटल्या फेकण्यात आलेल्या आहेत. या बाटल्या काचेच्या असल्याने पादचार्यांसाठी त्या धोकादायक ठरू लागल्या आहेत. सिरिन्जदेखील उघड्यावर टाकण्यात आलेल्या आहेत. या भागात गुरे चरत असतात.आजूबाजूला लोकवस्ती असल्याने सर्वांसाठी हा वैद्यकीय कचरा चिंतेचे कारण बनलेला आहे. अनेक ठिकाणी काचेच्या औषधांच्या बाटल्या या भागात आढळून येतात. रात्रीच्यावेळी कोणी नसल्याची संधी साधून कचरा फेकला जात असल्याचे नागरिकांनी ‘पुढरी’शी बोलताना सांगितले. सुया आणि औषधांच्या बाटल्याबरोबर सलायन, सॅनिटरी नॅपकिन्स इस्पितळातील तुटलेले बेसिन आणि शौचालयाचे साहित्य या ठिकाणी सर्वत्र विखुरलेल्या स्थितीत आढळते. कुडचडे भागात एक सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, तीन इस्पितळे, एक नर्सिंग होम, सुमारे चार क्लिनिक आहेत. विशेष म्हणजे या इस्पितळातील वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुडचडे काकोडा नगरपालिकेजवळ आवश्यक यंत्रणा उपलब्ध नाही. लवकरच काकोडा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प निर्माण झाल्यानंतर त्यात वैद्यकीय कचर्यावर सोपस्कर करणे शक्य आहे.
या विषयी कचरा व्यवस्थापनाचे काम पाहणारे पालिकेचे कनिष्ठ अभियंता दिप्तेश देसाई यांना विचारले त्यांनी सांगितले, की वैद्यकीय कचरा जरी पालिका स्वीकारत नसली तरी तो कचरा गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून स्वीकारला जातो. उघड्यावर वैद्यकीय कचरा फेकणे हे अवैध आहे. संबंधित इस्पितळावर गंभीर स्वरूपाची कारवाई होऊ शकते. या प्रकाराची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
Tags : Goa, Kudchade, Open, medical, waste