Sun, Jul 21, 2019 07:50होमपेज › Goa › पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा; आज डिस्चार्ज देण्याची शक्यता 

पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा; आज डिस्चार्ज देण्याची शक्यता 

Published On: Feb 28 2018 12:04AM | Last Updated: Feb 27 2018 11:54PMपणजी : प्रतिनिधी

बांबोळी येथील गोमेकॉ   इस्पितळात  दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती सुधारली असून त्यांना बुधवारी दुपारपर्यंत डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. संसर्गाची बाधा होऊ नये म्हणून पर्रीकर हे कार्यालयात न जाता घरातूनच काम करण्याची शक्यता असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

पर्रीकर यांना रविवारी रात्री ‘डिहायड्रेशन’चा त्रास झाल्याने व  रक्तदाब कमी झाल्यामुळे गोमेकॉत दाखल करण्यात आले होते.   गोमेकॉतील वार्ड क्रमांक-121 मधील  ‘व्हीआयपी’ कक्षात त्यांना ‘कॉर्डन’ करण्यात आले होते. त्यांच्या  डॉक्टर व दोन्ही पुत्रांशिवाय अन्य कोणालाही या कक्षात प्रवेशास मनाई  करण्यात आली होती. 

पर्रीकर यांच्यावरील मुंबईतून सुरू असलेल्या आधीच्या उपचारामुळे त्यांना ‘डिहायड्रेशन’चा त्रास झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आता ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून मंगळवारी त्यांना आणखी काही परीक्षणासाठी ठेवण्यात आले होते. यामुळे बुधवारी सकाळी डॉक्टरांचे पथक पुन्हा पर्रीकरांचा वैद्यकीय अहवाल तपासून दुपारपर्यंत डिस्चार्ज देण्याबाबत निर्णय घेण्याची    शक्यता असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

घरातूनच पाहणार कामकाज

मुख्यमंत्री पर्रीकर यांना ‘डिहायड्रेशन’चा  त्रास झाल्याने गोमेकॉत उपचारासाठी भरती व्हावे लागले होते. त्यांच्या प्रकृतीबाबत सर्व गोमंतकीयांमध्ये काळजीचे वातावरण पसरले असून त्यांनी  लवकर बरे व्हावे म्हणून अनेकांनी प्रार्थनाही केल्या आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृती सुधारली असून बुधवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. पहिल्यापेक्षा त्यांची प्रकृती स्थिर असून ते घरातूनच कामकाज पाहणार असल्याचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना सांगितले.