होमपेज › Goa › आयात मासळी धोकादायक नाही

आयात मासळी धोकादायक नाही

Published On: Jul 13 2018 12:48AM | Last Updated: Jul 13 2018 12:24AMपणजी : प्रतिनिधी

गोमंतकीय जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी परराज्यातून गोव्यात येणार्‍या मासळीची गुरुवारी सखोल शास्त्रीयरीत्या तपासणी करण्यात आली. प्रयोगशाळेत मासळीच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून, या मासळीतील ‘फार्मोलिन’चे प्रमाण मर्यादेच्या आत असून ते मानवी सेवनासाठी धोकादायक नसल्याचा अहवाल आला असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांनी सांगितले. 

सरदेसाई म्हणाल्या की, अन्न आणि औषध प्रशासनाच्या दोन तुकड्या उत्तर आणि दक्षिण गोव्यात पाठवण्यात आल्या. या दोन्ही तुकड्यांनी गुरुवारी पहाटे 4 वाजता मासळीच्या घाऊक बाजारात जाऊन परराज्यातून आवक होत असलेल्या मासळीची तपासणी केली. केरळ, तामिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतून गोव्यात मासळीची नियमित आयात केली जाते. उत्तर आणि दक्षिणेतील बाजारात दाखल झालेल्या 17 गाड्यांतील आणि एका स्थानिक मासळी विक्रेत्याजवळील असलेल्या मासळीचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. यामध्ये पेडये, बांगडा, तार्ले, गोब्रो, सवनाळे, तिसर्‍या, मुड्डोशी, पांढरे पापलेट, वेर्ल्या आणि कोळंबीचा समावेश होता. या नमुन्यांच्या घटनास्थळी केलेल्या प्राथमिक चाचणीत ‘फार्मोलिन’चा अंश काहीसा अधिक प्रमाणात आढळला. त्यामुळे प्रयोगशाळेत पूर्ण चाचणी झाल्याशिवाय सर्व मासळी विक्रेत्यांना त्यांच्याकडील मासळी न विकण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, ताब्यात घेतलेले सर्व मासळीचे नमुने तातडीने बांबोळी येथील प्रशासनाच्या प्रयोगशाळेत आणून त्यावर शास्त्रीय चाचणी  करण्यात आली. 

एफडीएने राबवलेल्या  खास मोहिमेमुळे राज्यात विकली जाणारी मासळी सेवनासाठी सुरक्षित असून त्यात कोणातेही धोकादायक रसायन नसल्याचे सिद्ध झाल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. मात्र प्रशासन यापुढेही राज्यात विकल्या जाणार्‍या मासळीमध्ये अपायकारक ‘फार्मोलिन’चे प्रमाण आहे का याबाबत चौकस राहणार असून अचानक तपासणी करण्याचे काम सुरू ठेवले जाणार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.