Thu, May 23, 2019 15:24
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › मोले महामार्गालगत मद्यविक्री बंदीची ‘एैशीतेशी’

मोले महामार्गालगत मद्यविक्री बंदीची ‘एैशीतेशी’

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 13 2018 10:29PMमडगाव  : (विशाल नाईक)

राज्यात  महामार्गालगतची  दारू विक्रीची दुकाने बंद असली तरी मोले चेक पोस्ट परिसर मात्र  सर्वोच्च न्यायालयाच्या बंदी आदेशाला अपवाद ठरला आहे.मोलेत मद्यविक्रेते  छुप्यारितीने घरात दारू साठवून त्याची विक्री करू लागले आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रात दारूबंदी पूर्वीपासून लागू असल्यामुळे गोव्यात येणारे कर्नाटकी पर्यटक मोलेत खास थांबा घेऊन वाहनांमध्ये लपवून दारूची   तस्करी करू लागले असून अबकारीच्या चेकपोस्ट पासून आणि पोलिस उपचौकीपासून अवघ्या दहा मीटर्सवर दारू तस्करीचा प्रकार घडत असूनही  त्यांचे दुर्लक्ष होत आहे.

दारू बंदीच्या आदेशापूर्वी  राजरोसपणे दारूचा व्यवसाय सुरू होता.पण आता   दारू विक्री बंद झाल्याने दारूची दुकाने चालविणार्‍या स्थानिकांनी आपल्या घरात दारू साठवणे सुरू केले आहे.घाऊक दुकानांवर लोकांना रेड बुल,पाण्याच्या बाटल्या आणि शीतपेयाच्या  बाटल्या दिसून येतील, पण परराज्यातील पर्यटक दारू साठी येताच त्यांना घरातून दारू काढून दिली जाते. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे. मोले येथे चेक पोस्ट परिसरात मोले ते अनमोड घाट रस्त्यावर सुमारे सात दारूची दुकाने आणि बार आहेत.न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व दुकाने बंद करण्याची वेळ स्थानिकांवर आली होती आता वाईन शॉप  या नावाऐवजी  केवळ स्टोअर्स असे नाव लावण्यात आले असून जनरल स्टोअर्स च्या नावाखाली पर्यटकांना सर्रास दारूची बेकायदेशीर विक्री केली जात आहे.

 कर्नाटकातून दररोज  हजारो पर्यटक अनमोडमार्गे गोव्यात दाखल होतात.काही लोक व्यवसायाच्या निमित्ताने येतात, तर काहीजण जीवाचा गोवा करण्यासाठी दाखल होतात.कारवार, मुर्डेश्वर किंवा गोकर्ण येथे देवदर्शनास जाण्यासाठी गोव्यातून शॉर्टकट रस्ता असल्याने कर्नाटकातील लोक मोले,केपे आणि काणकोण मार्गाचा वापर करतात.परततानासुद्धा अनमोड घाटाचा पर्याय स्वीकारला  जातो.अनमोड घाट लागण्यापूर्वी विश्रांती घेण्यासाठी पर्यटक मोले चेक पोस्ट जवळ थांबतात.हा मोलेचा मुख्य बाजार असून या ठिकाणी घाऊक दारू विक्रीची अनेक दुकाने आहेत.जीप गाड्या घेऊन येणारे पर्यटक आणि लोखंड तसेच इतर साहित्य घेऊन येणारे एलपी ट्रक चालक या दुकानातून दारूच्या बाटल्या खरेदी करता.

येथून सुमारे दहा मीटर अंतरावर अबकारी कार्यालयाचा चेक पोस्ट आणि पोलीस आऊटपोस्ट आहेत. अधिकार्‍यांच्या हाती दारू लागू नये या साठी बाटल्या गाडीच्या दरवाजात,स्पीकर बॉक्स मध्ये,सीट च्या आत तसेच स्टेपनीच्या टायर मध्ये लपवून तस्करी केली जाते.काही जण शितपेयाच्या बाटलीत दारू घालून कर्नाटकात नेत आहेत. मोलेत अबकारी कर्मचारी आणि पोलिस  डोळ्यांना पाने पुसण्यासाठी  गाड्या तपासत आहेत.पुढे अनमोड घाटात कर्नाटक हद्दीत दुसरा चेक नाका लागतो तिथेही  त्यांची तपासणी होत नाही.काही ट्रक चालकांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले,की गोव्यात पाचशे रुपये  किंमत असलेली दारूची एक बाटली कर्नाटकात दोन हजार रुपयांना विकली जाते.गोवा आणि कर्नाटक राज्याच्या अधिकार्‍यांच्या नाकावर टिच्चून दररोज लाखो रुपयांच्या दारूची तस्करी केली जात आहे.

धारबंदोडा तालुक्याला अजून अबकारी कार्यालय मंजूर झालेले नाही.त्यामुळे सांगे येथील  कार्यालयातून मोले येथील कामकाज हाताळले जाते.या विषयी सांगे अबकारी निरीक्षक प्रशांत पैंगीणकर यांनी सांगितले,की न्यायालयाच्या आदेशानुसार मोले भागातील महामार्गालगत 500 मीटर्स अंतरातील दारूची दुकाने बंद आहेत.नव्या अधिसूचनेनुसार पालिका क्षेत्रालगतच्या पंचायत क्षेत्रातील दारूची दुकाने चालू शकतात.पण मोलेत कोणतीही दारूची दुकाने सुरू नाहीत, असेही ते म्हणाले.

Tags  : Goa, Illegal, alcohol, transport,  highway