Fri, Mar 22, 2019 07:43होमपेज › Goa › मासळी आयात बंद न केल्यास आंदोलन छेडणार

मासळी आयात बंद न केल्यास आंदोलन छेडणार

Published On: Jul 15 2018 1:28AM | Last Updated: Jul 14 2018 11:45PMमडगाव : प्रतिनिधी 

भाजप सरकार चांगल्या दर्जाची मासळी अल्पदरात गोमंतकीयांना पुरवण्यात अपयशी ठरल्याने फार्मोलिनयुक्त घातक मासळीची आयात करून जाणीवपूर्वक गोमंतकीयांचा जीव धोक्यात घालत आहे. सरकारने तोंडी आश्वासने न देता प्रत्यक्षात कृती करून  परराज्यातून  मासळीची आयात बंद करावी. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन  छेडू ,असा इशारा कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. 

  रेजिनाल्ड म्हणाले की, ओडिशा सारख्या अनेक राज्यात काही वर्षांपूर्वी फार्मोलिन हा घातक घटक मासळीत  आढळल्याने त्यावर  बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीतही   महाराष्ट्र , ओडिशा, तामिळनाडू,आंध्रप्रदेश, केरळ आदी  राज्यांतून सरकार मासळीची आयात करत आहे.

दोन दिवसांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाने माडेल येथील घाऊक मासळी बाजारात आयात मासळीची चाचणी करून त्यात  फार्मोलिनचा अंश असल्याचे  प्राथमिक अहवालात स्पष्ट केले होते. दुसरी चाचणी बांबोळी येथील प्रयोगशाळेत करण्याची गरजच नव्हती. दुसरा  अहवाल  नकारात्मक आल्याचे दर्शवून सरकार आपले घोटाळे लपविण्याचे काम करत आहे. 

फार्मोलिन हे रसायन मानवी अररोग्याला   घातक असून  हळुहळू आरोग्यावर परिणाम करणारे आहे. याची जाणीव  असतानाही सरकार गोमंतकीयांना बळी घेत आहे. दिवस रात्र एक करून गोमंतकीय खलाशी विविध प्रकारचे मासे गोमंतकीयांच्या ताटात पोचवितात. गोमंतकीयांना उत्कृष्ट दर्जाची मासळी चांगल्या किमतीत देण्यास गोमंतकीय खलाशी खंबीर आहेत. मात्र   मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वतः आपण मासळीच्या मोहात  लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घेऊन गोव्यात परतलो,असे  सांगत असून   आयात होणारी फार्मोलिन युक्त मासळी  स्वीकारतात, हे पाहून आश्चर्य वाटते,असे   रेजिनाल्ड म्हणालेे. 

बाजारात विकले जाणारे मासे तसेच फळ भाज्यांसारखे  अन्य खाद्यपदार्थ अन्न आणि औषध प्रशासनाने  रोजच्या रोज तपासणे महत्वाचे आहे. तर हॉटेल्स, कॅन्टीन, व अन्य  स्टॉल्स वरील खाद्यपदार्थांची चाचणीही प्रशासनाने करावी, अशी मागणी आमदार रेजिनाल्ड यांनी  प्रशासनाकडे केली.