Tue, Jul 16, 2019 21:49होमपेज › Goa › पणजी पीडीए रद्द न केल्यास सहा एप्रिलला धडक मोर्चा

पणजी पीडीए रद्द न केल्यास सहा एप्रिलला धडक मोर्चा

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 16 2018 12:26AMपणजी : प्रतिनिधी

ग्रेटर पणजी पीडीए रद्द करा. या पीडीएतून सांताक्रुझ व  सांतआंद्रेला न वगळल्यास  6 एप्रिल रोजी पणजीत धडक मोर्चा आणला जाईल, असा इशारा सांताक्रुझचे नागरिक रुडॉल्फ फर्नांडिस यांनी पणजीत पत्रकार परिषदेत दिला.

पीडीए विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाणार असून वेळ पडल्यास रस्ते अडवले जातील. यावेळी निर्माण होणार्‍या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍नाला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

फर्नांडिस म्हणाले, की 19 मार्च रोजी नगरनियोजन मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत जर ग्रेटर पणजी पीडीएतून सांतआंद्रे व सांताक्रुझला वगळण्याचा निर्णय झाला नाही तर 6 एप्रिल रोजी पणजी शहरात मोर्चा काढला जाईल. सदर मोर्चा संध्याकाळी 4 वाजता पणजी बसस्थानक ते आझाद मैदान असा असेल. यात दोन्ही मतदारसंघातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होतील.

सांताक्रुझचे नागरिक आर्थुर डिसोझा म्हणाले, ग्रेटर पणजी पीडीएमधून सांताक्रुझ, बांबोळी- कुडका, शिरदोण, आजोशी-मंडुर या पंचायती वगळण्या याव्यात, अशी मागणी वेळावेळी सरकारकडे करण्यात आली. या संदर्भात नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनाही निवेदन देण्यात आले. ग्रेटर पणजी पीडीएवर  केवळ राजकारण्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. या पीडीएचे अध्यक्षपद हे बाबूश मोन्सेरात यांना देण्यात आले आहे, ज्यांना नियोजनाचा कुठलाही अनुभव नाही. केवळ मोठ्या इमातरी  उभारणे किंवा रस्ते बांधणे म्हणजे विकास नाही. पीडीएच्या नावाखाली जमिनी ताब्यात घेण्याचा डाव असून आमच्या जमिनी आम्हाला परत  द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

रामा काकोणकर म्हणाले, की  ग्रेटर पणजी पीडीएत फक्‍त तिसवाडीचाच समावेश का करण्यात आला? विकास करायचाच आहे तर मग राज्यातील अन्य तालुक्यांचा समावेश पीडीएमध्ये का करीत नाहीत, पीडीएच्या नावाखाली जनतेची फसवणूक करण्याचा हा डाव आहे.