मडगाव : प्रतिनिधी
दूधसागर धबधब्यावर ट्रेकिंगसाठी पुण्याहून आलेल्या तेरा जणांच्या गटातील सुहागता बसू (वय 25) ही मूळ पश्चिम बंगाल येथील आणि व्यवसायाने पीक महिंद्रा कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता असलेली युवती प्रवाहात वाहून गेल्याचा प्रकार रविवारी सकाळी सोनावळी रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही मीटर अंतरावर घडला.तिला वाचवण्यासाठी तिच्या अन्य तिघा सहकार्यांनी प्रयत्न केले होते पण पाण्याची गती वाढल्याने तिघेही वाहून गेले. मात्र, दैव बलवत्तर म्हणून झाडाच्या आधाराने त्यांनी स्वतःचा जीव वाचवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातून ट्रेकिंगसाठी दोन गट रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून कुळेत आले होते. याच रेल्वेने ते दूधसागर धबधब्यापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या सोनावळी स्थानकावर उतरले होते.तेरा जणांच्या एका गटात सुहागता बसू आणि तिचा एक मित्र असे दोघेजण पुण्यातील आयटी सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचारी होते. तर इतरजण विविध भागातून आले होते.
दूधसागर धबधब्याच्या पूर्वी कुळे वन विभागाचा एक काऊंटर लागतो. सकाळी नऊ वाजल्यापासून तिथे वन कर्मचारी हजर असतात. या गटाने पहाटे जंगलात प्रवेश केला आणि हा वनखात्याचा काऊंटर चुकवून ते दूधसागरकडे चालत गेले. पाऊस सुरूच असल्याने ओहोळातील पाण्याचा वेग बराच वाढला होता. परत येताना त्यांनी सोनावळीजवळ लागणार्या एक हॉटेलवर चहासुद्धा घेतला. आणि परत जाण्यासाठी दोरी बांधून ओहोळात प्रवेश केला पण प्रवाहाचा वेग वाढल्याने तिसर्या क्रमांकावर असलेल्या बसू हीचा दोरीवरील हात निसटला आणि ती पाण्यात वाहून गेली. इतर तिघांनी तिला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली होती, पण प्रवाहाच्या वेगात तेही वाहून गेले. मात्र झाडांचा आधार घेऊन स्वतःला वाचवण्यात त्यांना यश आले. स्थानिक लोकांच्या आणि सहकार्यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले.
पोलिस निरीक्षक निलेश धायगोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच कुळे पोलिस व वन विभागाने संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. अंधारात शोध घेणे शक्य नसल्याने आणि पाणी गढूळ झाल्याने सायंकाळी 6.30 वाजता शोधमोहीम थांबविण्यात आली.वनपाल परेश पोरोब यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, हा गट वन विभागाच्या परवानगीशिवाय जंगलात गेला होता. तसेच त्यांच्याबरोबर एकही स्थानिक गाईड नव्हता. पुणे येथील स्वतःला ट्रेकर म्हणवून घेणार्या एका गाईडने हा ट्रेक आयोजित केला होता. यापूर्वीही दोनवेळा तो ट्रेकर्सना घेऊन दूधसागरवर आला होता, असे समजते.