Sun, Aug 25, 2019 12:26होमपेज › Goa › जगभ्रमंती केलेल्या महिलांचे कार्य प्रेरणादायी 

जगभ्रमंती केलेल्या महिलांचे कार्य प्रेरणादायी 

Published On: May 22 2018 1:24AM | Last Updated: May 22 2018 1:06AMपणजी : प्रतिनिधी

भारतीय बनावटीच्या आयएनएसव्ही ‘तारिणी’ या नौकेवर ‘नाविका सागर परिक्रमा’  उपक्रमांतर्गत जगभ्रमंतीवर गेलेल्या नौदलातील सहा महिला अधिकार्‍यांचे सोमवारी  संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेरे येथे स्वागत केले. या  मोहिमेद्वारे या महिलांनी  इतिहास रचला असून त्यांचे  यश केवळ अन्य महिलांनाच प्रोत्साहन देणारे नसून देशातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 

जोरदार वाहणारे वादळी वारे, खवळलेला समुद्र आणि उसळणार्‍या लाटा या सर्वांवर मात करत भारतीय नौदलाच्या महिला अधिकार्‍यांनी सागरी मोहीम यशस्वी केली. नौकेची  धुरा लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांनी सांभाळली. त्यांच्यासमवेत मोहिमेत  लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पतरपल्ली स्वाती,  लेफ्टनंट ऐश्‍वर्या बोडापट्टी, लेफ्टनंट एस. एच. विजयादेवी,  लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश होता. 

या महिलांनी 10 सप्टेंबर 2017  रोजी वेरे येथूनच या मोहिमेला सुरुवात केली  होती.  समुद्र खवळलेल्या अवस्थेत असताना पाऊस आणि वार्‍याला न जुमानता या धाडसी महिलांनी 21 हजार 600 नॉटिकल मैलांचा प्रवास साडेआठ  महिन्यांत  पूर्ण केला आहे. या मोहिमेत महिलांनी पाच देशांना भेट दिली असून  चार खंड  व तीन महासागर पार करून त्यांनी मोहीम पूर्ण केली आहे. 

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मोहिमेवर गेलेल्या सहाही दर्यावर्दी महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा आणि इतर वरिष्ठ नौदल अधिकारी यावेळी उपस्थित  होते.  या  साहसी महिलांसह तारिणी नौकेचे स्वागत करताना आपल्याला अभिमान वाटत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. 

या चमूच्या कर्णधार वर्तिका जोशी यांनी सांगितले की, समुद्रात 194 दिवसांच्या प्रवासात समुद्राच्या उसळणार्‍या लाटांशी सामना करावा लागला; मात्र आमचे मनोबल कधीच खचले नाही. महिलांच्या सबलीकरणावर भर देणारी ही मोहीम होती. नौदलातून घेतलेल्या कठोर प्रशिक्षणानंतर या मोहिमेवर जाण्याची संधी मिळाली. मोहिमेत प्रथम ऑस्ट्रेलिया येथील फ्रेमेंटल येथे 12 दिवस वास्तव्य करून तेथील लोकांशी संवाद साधला. त्यानंतर न्यूझीलंड,  पॅसिफिक महासागरातील फॉकलँड,  केपटाऊन या ठिकाणांना भेट दिली.  ही मोहीम कायमची स्मरणात राहिल, असा अनुभव असून यात कित्येक अनुभव गाठीशी बांधले गेले. 

नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा म्हणाले, समुद्रातील आव्हानांना पेलत महिलांनी आपले नाव इतिहासात कायमचे कोरले आहे. या चमूने  नौदलाचा व देशाचा झेंडा जगाच्या नकाशावर उंचावला आहे.  
भारतात पूर्णपणे महिला कर्मचार्‍यांसह  हा  जगप्रवास  पहिल्यांदाच घडून आला आहे. आयएनएसव्ही तारिणी ही आयएनएसव्ही म्हादईची पुढची आवृत्ती आहे. भारत सरकारचा नारी शक्तीला असलेला भक्कम पाठिंबा लक्षात घेता हा प्रकल्प सागरी नौकानयन उपक्रमांच्या प्रचारासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.   

देशाच्या संरक्षणमंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर दिल्‍लीबाहेर सर्वात प्रथम जो कार्यक्रम  हातून घडला तो  या 6 महिलांच्या जगप्रवासाची सुरुवात होय. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान मानते. या चमूच्या समर्पणामुळे हा प्रवास शक्य झाला असून गेल्या आठ महिन्यांत वेळोवेळी या चमूबद्दल आपल्याला विविध कार्यक्रमांत विचारण्यात आले. या महिलांबद्दल सांगणेदेखील फार अभिमानास्पद होते. नौदलातर्फे दरवर्षी अशी एखादी मोहीम राबविली जावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: येत्या बुधवारी या  साहसी महिलांची भेट घेऊन शुभेच्छा देणार आहेत, ही गोष्टी आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे.   

 -निर्मला सीतारामन, संरक्षणमंत्री